Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी 

कल्याणमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी 

Published On: Jun 16 2018 3:42PM | Last Updated: Jun 16 2018 3:42PMडोंबिवली : वार्ताहर

देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदचा चंद्र शुक्रवारी सायंकाळी दिसल्यानंतर शनिवारी सकाळी 9 वाजता ठिकठिकाणच्या मशिदीत ईदनिमित्त खास नमाज पठणासाठी जिल्ह्यातील लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. तर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील ईदगाह येथे हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले.

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. ‘ईद उल फित्र’ निमित्त जिल्हाभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नमाज पठनानंतर शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करताना मुस्लिम बंधु- भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

कल्याण शहरात 30 ते 35 लहान मोठ्या मशीद असून त्यामध्ये जामा मशीद, काळी मशीद, मेनन मशीद, टेकडी कबरस्थान,बैलबाजार, कोटबहार, जुम्मा मशीद येथे मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. कल्याणातील रेतीबंदर, दूधनाका, दुर्गाडी, वल्लीपीर चौक, गफूर डोन चौक आदी मुस्लीम वस्त्यांत यावेळी जल्लोषाचे वातावरण होते. कल्याण शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.