Mon, Aug 26, 2019 00:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक लाख कोटींच्या बुलेट ट्रेनची काय गरज : राज ठाकरे

एक लाख कोटींच्या बुलेट ट्रेनची काय गरज : राज ठाकरे

Published On: Jul 03 2018 7:59PM | Last Updated: Jul 03 2018 7:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अंधेरीमध्ये  झालेल्या पादचारी पुलाच्या झालेल्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा बुलेट ट्रेनला लक्ष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज यांनी एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर गेल्यावर्षी ३० सप्टेंबर २०१७  ला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड करून आजच्या घटनेवर भाष्य केले आहे. मुंबईसारख्या शहरातील पायाभूत सुविधा आधी नीट करा ह्यासाठी जनमताचा दबाव तयार करायलाच हवा असेही त्यांनी म्हटले आहे. 

दररोज लाखो मुंबईकर जीव मुठीत घेऊन प्रवास करत असताना १ लाख कोटींच्या बुलेट ट्रेनची काय गरज आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आज अंधेरीतील दुर्घटनेनंतर सामान्य मुंबईकर हाच प्रश्न विचारत असल्याचे राज यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राज यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्ह्टले आहे, की रेल्वेच्या एकूणच सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या अहवालानुसार सिग्नल यंत्रणेपासून, पुलांचं नूतनीकरण करण्यासाठी २०१२ ते २०१७ ह्या कालावधीत १ लाख कोटींची गुंतवणूक करायला हवी असं अहवाल सांगतो. पण आधीच्या काँग्रेस सरकारने आणि आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हा अहवाल बासनात गुंडाळून ठेवला.

शहरांचं नियोजन पार कोलमडलेलं आहे, सध्याच्या पायाभूत सुविधांची साधी डागडुजी करायला सरकारच्या सरकारच्या खिशात दमडी नाही आणि तरीही हजारो,लाखो कोटींच्या अवास्तव प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात आहेत.