होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीत मुसळधार; रेल्वेचे रूळ गायब

मुसळधार सुरुच; रेल्वेचे रूळ गायब, चाकरमान्यांचे हाल

Published On: Jul 07 2018 12:08PM | Last Updated: Jul 07 2018 12:21PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने फज्जा उडविला आहे. शनिवारी सकाळी मात्र कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणच्या स्टेशन परिसरात नद्या वाहू लागल्या आणि रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली. परिणामी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे. ठाणे, पालघर, पुणे, रायगडसह कोकण किनारपट्टीमधे मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुक कोलमडली असून लोकल कल्याण, कर्जत, कसारा मार्गावर ठप्प झाल्या आहेत. 

सतत दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने तसेच धोक्याची पातळी ओलांडल्याने पनवेल रेल्वे स्थानक तसेच मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत रेल्वे स्थानक, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी या स्थानक दरम्यान रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकल कल्याण पर्यंतच अप डाऊन मार्गावर सुरु आहेत. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या देखील खोळंबल्या असून यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

दरम्यान कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांचे हाल सुरु असून त्यांना पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने घरी परतावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक दरम्यान प्रवाशांचे प्रचंड गर्दी झाली आहे. तर काही लोकल रुळावरच खोळंबल्या असल्याने मध्य रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. तर ट्रान्सहार्बर मार्गावर दहा मिनिटे लोकल उशिरा धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना पुढील प्रवास करताना प्रचंड गर्दीचा सामना करत खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी रेल्वे प्रशासनावर संतापले आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विठ्ठलवाडी जवळ रुळावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रेल्वे स्थानकांवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. बदलापूरमध्ये देखील रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकाळपासूनच येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे याचा फटका रेल्वेला बसला आहे.

लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांना ही याचा फटका बसला आहे. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावरुन वळवण्यात आली आहे. ठाणे, वसई-विरार आणि रायगड या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे  कल्याण-डोंबिवलीचा परिसर जलमय झाला आहे. तसेच पावासच्या पाण्याने गटारे तुंबली असून पाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नाले व गटारे सफाई कामाची पोलखोल झाली. कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत लहान-मोठे रस्ते, कल्याण-शीळ मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांची अडचण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण व शहर भागात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक रस्ते, चौक पाण्याखाली गेले आहेत. कल्याणहून नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिर्ला गेट ते वरप गाव परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला असून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. तसेच दुर्गाडी पुलावरही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. अशीच परिस्थिती कल्याण-शिळ मार्गावर दिसून आली. परिणामी वाहनचालक, तसेच सर्वसामान्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. त्यातच मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या अनियमित वेळेत धावत होत्या. 

गटारातील पाणी रस्त्यावर; पालिकेचा भोंगळ कारभार
कल्याण-डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. नालेसफाईचे काम सुरू असून पावसाळा सुरू व्हायच्या आत ते पूर्ण होईल असे आश्वासन महापौर विनिता राणे यांनी दिले होते. मात्र दोन आठवड्यानंतर परतलेल्या पावसानेच सत्ताधाऱ्यांचा हा दावा किती फोल आहे ते दाखवून दिले. कल्याण-डोंबिवली महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पालिकेला लागून असणाऱ्या आचार्य अत्रे रंगमंदिर परिसरात रस्त्यावर आलेल्या गटाराच्या घाणेरड्या पाण्याने तर पालिकेच्या नालेसफाईवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले.