होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अवकाळी पावसामुळे मुंबईला भरली हुडहुडी

अवकाळी पावसामुळे मुंबईला भरली हुडहुडी

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:36AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईच्या इतिहासात प्रथमच डिसेंबर महिन्यात पावसाने जनजीवन विस्कळीत केले. पश्‍चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचा वेग मंदावल्यामुळे सकाळी कामावर निघालेले चाकरमानी रखडले. धुरकट वातावरण व पावसाची रिपरिप यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीचे दर्शन घ्यायला आलेल्या राज्यासह देशातील लाखो अनुयायांचे अक्षरश: हाल झाले. दरम्यान, बुधवारी पावसाची रिपरिप सुरूच राहणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले. 

शहरातील वातावरण धुरकट झाल्यामुळे वाहनांचाही वेग मंदावला. डी. एन. रोड, काळबादेवी, पायधुनी, ग्रॅण्ट रोड, परळ, दादर येथील सेेनापती बापट मार्ग, पश्‍चिम उपनगरातील पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, लिंक रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, अंधेरी-कुर्ला रोड, पूर्व उपनगरातील एल. बी. एस. मार्गसह कुर्ला, घाटकोपर, भांडूप भागात वाहतूक कोंडी झाली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बुधवारी असल्यामुळे सोमवारी रात्रीपासून आंबेडकर अनुयायी दादर चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. पावसामुळे दादर स्टेशनवर उतरलेल्या अनुयायांना चैत्यभूमीपर्यंत भिजत जाणे भाग पडले. काहींनी पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दादर रेल्वे स्टेशन, बसस्टॉपचा आसरा घेतला. त्यामुळे दादर रेल्वे स्टेशनसह पादचारी पूल अनुयायांनी भरून गेले होते. शिवाजी पार्क मैदानात पालिकेने अनुयायांच्या निवासस्थानाची सुविधा केली होती. पण पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पालिका शाळांमध्ये त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली. अनुयायांना स्टेशन येथून चैत्यभूमीपर्यंत सोडण्यासाठी बेस्टनेही दादर स्टेशन येथून विशेष बस सोडल्या होत्या. पण बस खचाखच भरून जात असल्यामुळे अनुयायांनी पायी जाणे पसंत केले.