Wed, Jan 23, 2019 04:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 6 ते 12 जून मुंबईला रेन अ‍ॅलर्ट!

6 ते 12 जून मुंबईला रेन अ‍ॅलर्ट!

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 2:08AMमुंबई /पुणे : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत 6 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा ‘स्कायमेट  वेदर’ या संस्थेने दिला असून, 26 जुलै 2005 पेक्षा जास्त भयानक परिस्थिती उद्भवू शकते, असेही म्हटले आहे. दरम्यान मान्सून आज (बुधवार) गोव्यात एंट्री करणार असून, उद्या (गुरुवार) तळ कोकणात तो डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

26 जुलै 2005 हा दिवस कोणताही मुंबईकर विसरू शकणार नाही. त्या दिवशी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीने देशाच्या आर्थिक राजधानीत जलप्रलयासारखी स्थिती निर्माण झाली होती. एकाच दिवसात तब्बल 900 मि.मी. पाऊस पडला होता. 

तितकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पाऊस येत्या आठवड्यात मुंबईत पडू शकतो, असा इशारा ‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी जतिनसिंग यांनी एक ट्विट करून दिला आहे. मुंबईत 8 जूनपासून पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांनी सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात 42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीने मुंबईकरांना पावसात गाठले. 18 विमानांच्या वाहतुकीची दिशा बदलण्यात आली होती.

दि. 7 ते 12 जूनदरम्यान कोकण किनारपट्टी, मुंबई येथे वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी 120 मि.मी., मुंबई 50 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) मंगळवारी आणखी प्रगती करत कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडू, रायलसीमा व आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, पश्‍चिम मध्य बंगालचा उपसागर व्यापला.