होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुंबईची रेल्वे, रस्ते वाहतूक कोलमडली

तुंबईची रेल्वे, रस्ते वाहतूक कोलमडली

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारीही पावसाचा जोर कायम होता.  रेल्वेमार्गात पाणी तुंबल्यामुळे पश्‍चिम रेल्वेसह मध्य रेल्वेची मेन व हार्बर उपनगरीय सेवा धीम्या गतीने सुरू होती. बेस्ट बससह हजारो गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांचे हाल झाले. अनेक चाकरमान्यांनी कामावर दांडी मारून घरी बसणे पसंत केले. शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे लोकांनी जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत-काढत घर गाठले. 

मुंबईत रविवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सोमवारी दिवसभरात शहरात 60 मिमी, पूर्व उपनगरात 70 मिमी व पश्‍चिम उपनगरात 90 मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे शहरात  गांधी मार्केट, परळ, हिंदमाता, भायखळा, माटुंगा, ग्रॅण्ट रोड, भारतमाता, मुंबई सेंट्रल, ताडदेव, काळाचौकी येथे तर पश्‍चिम उपनगरात दहिसर, मिलन, मालाड, खार सबवेसह एस. व्ही. रोड, अंधेरी विरा देसाई रोड, विलेपार्ले, जोगेश्‍वरी, मालाड, मालवणी, गोराई, अंधेरी-कुर्ला रोड, मेघवाडी, कांदिवली, चारकोप तसेच पूर्व उपनगरात एलबीएस मार्ग, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, भांडुप, चेंबूर, शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द आदी भागांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे येथील जनजीवनच विस्कळीत झाले. सायन, महेश्‍वरी उद्यान, नॅशनल कॉलेज वांद्रे, सिध्दार्थ हॉस्पिटल गोरेगाव, साईनाथ रोड, मिलन सबवे, अ‍ॅण्टॉप हिल सेक्टर 7, मोरारजी नगर फिल्टरपाडा आदी भागात कंबरेपेक्षा जास्त पाणी रस्त्यावर तुंबले होते. त्यामुळे या मार्गावरील बेस्ट बससह अन्य गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या.

बेस्टने आपले मार्ग बदलले

मुंबईत रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे बेस्टचे अनेक बसेसचे मार्ग वळवण्यात आले. मुंबईत आठ भागात पाणी साचल्याने बेस्टने शहर आणि उपनगरांतील 47 मार्गांवरील बसेस वळवल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली. कोणतीही पूर्वकल्पना न देता बेस्टने या मार्गांवरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आल्याने प्रवासी बराच वेळ त्याच थांब्यावर बसची वाट पाहत उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.मुसळधार पाऊस व रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे पश्‍चिम व पूर्व द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, लिंक रोड, एल. बी. एस. मार्ग, जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड, सायन जंक्शन, धारावी, भायखळा, डी. एन. रोड, पी डिमोलो मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी प्रमुख रस्ते व लालबाग व जे जे. उड्डाणपुलावरही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तासाभराचा प्रवास दोन ते तीन तासाने लांबला.