Fri, Jan 18, 2019 05:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलादपूर-आडवळे अपघातात तीन ठार 

पोलादपूर-आडवळे अपघातात तीन ठार 

Published On: Mar 14 2018 10:18PM | Last Updated: Mar 15 2018 12:49AMपोलादपूर : श्रीकृष्ण बाळ/ समीर बुटाला

पोलादपूर आडवली मार्गावर साखर पुड्यासाठी जात असलेल्या पार्टे, वाडकर कुटुंबाच्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात होवून या गाडीतील तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर 11 जण जखमी झाले आहेत. रात्रौ 8 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात भिकू तुकाराम मालुसरे, पांडूरंग धोंडू बिरामणे, अनिकेत अनंत सकपाळ हे तीन जण अपघातात ठार झाले आहेत. 

मुंबई गोवा महामार्गानजीक पोलादपुर आडवळे गावाजवळ पार्टेकोंड येथे राहणारे कुटुंबिय साखर पुड्यासाठी जात होते यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रौ 8.30 नंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते मात्र अपघात झाल्या नंतर अंधार असल्यामुळे जखमींना पोलादपुर ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यास वेळ लागल्याचे समजते. 

अपघातात तिघे दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडले असून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमींना आणण्यात आले होते. गाडी खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे समजते. गाडीतील अन्य कोणी दरीत कोसळले का याचा शोध घेतला जात आहे. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. वाघमोडे, डॉ. गुलाबराव सोनावणे, डॉ. सलगरे, डॉ. शिंदे यांनी उपचार सुरु केले होते.