Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरात ५ जीन्स वॉश कारखान्यांवर छापा

उल्हासनगरात ५ जीन्स वॉश कारखान्यांवर छापा

Published On: Jan 12 2018 1:54AM | Last Updated: Jan 12 2018 1:18AM

बुकमार्क करा
उल्हासनगर : वार्ताहर 

मुंबई, तळोजा येथे वॉशचा पाच पट खर्च येत असल्याने रात्रीच्या वेळेस चोरी छुपे वॉशचा कारभार करणार्‍या व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार्‍या उल्हासनगरातील पाच जीन्स कारखान्यांवर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. यावेळी लाखो रुपयांच्या जीन्स पँट जप्त करण्यात आल्या असून कारखान्यांना सील ठोकण्यात आले आहे. 

वालधुनी, उल्हास नदीला प्रदूषित केल्याचा ठपका ठेवून उल्हासनगरातील 510 जीन्सवॉश कारखाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. मात्र, तरीही चोरी छुपे वॉश करणारे कारखाने सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी याबाबत पालिका आयुक्त राजेंद्र  निंबाळकर यांच्याकडे व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार मिळताच, त्यांनी याची गंभीर दखल घेतली. यानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, प्रबोधन मवाडे यांनी सम्राट अशोक नगरातील कारखाना सील केला आहे. 

हा प्रकार कारखानदारांच्या अंगलट आला असल्याने चोरी छुपे चालवले जाणार्‍या कारखानदारांवर वचक बसणार, असे चित्र दिसू लागले असतानाच, खत्री कंपाऊंडमध्ये चक्क पाच कारखाने चोरी छुपे सुरू असल्याची माहिती आयुक्तांना मिळाली. त्यानुसार आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या उपस्थितीत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, प्रबोधन मवाडे, प्रमोद पाटील आदींनी छापा टाकून सात-आठ टेंपो जीन्स पँट जप्त करत कारखाने सील केले.