होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हमीभावासाठी अध्यादेश काढा : विखे पाटील

हमीभावासाठी अध्यादेश काढा : विखे पाटील

Published On: Feb 03 2018 5:30PM | Last Updated: Feb 03 2018 5:53PMमुंबई : प्रतिनिधी

तूर व हरबऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू असून, सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमीभावाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यावर्षी तुरीचा हमीभाव ५४०० रूपये असताना शेतकऱ्यांच्या हातात केवळ ४२०० रूपये टेकवले जात आहेत. हरबऱ्याला ४२०० रूपयांचा हमीभाव असताना केवळ ३२०० रूपये दराने खरेदी सुरू आहे. सोयाबीन खरेदीत शेतकरी अक्षरशः नागवला गेल्यानंतरही सरकारला जाग आलेली नाही. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी झाल्याच्या लेखी तक्रारी राज्यात अनेक ठिकाणी दाखल झाल्यानंतरही सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.

सरकारच्या याच निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना थेट मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याची टीका त्यांनी केली.