Wed, Nov 21, 2018 07:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोहराबुद्दीन केसमधून वरिष्ठ अधिकारी, नेते कसे सुटले?

सोहराबुद्दीन केसमधून वरिष्ठ अधिकारी, नेते कसे सुटले?

Published On: Feb 15 2018 2:14AM | Last Updated: Feb 15 2018 1:59AM



मुंबई : प्रतिनिधी

हायप्रोफाईल दोषींची सुटका, तडकाफडकी झालेल्या बदली, जामिनासंबंधीचे प्रश्‍न आणि साक्षीदारांवर साक्ष फिरवण्यासाठी असलेला दबाव या बाबींवर प्रकाशझोत टाकत, सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसमधील सगळ्या हायप्रोफाईल कैद्यांना जामीन कसा मिळाला? असा थेट सवाल माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत विचारला आहे. राजकीय दबाव, न्यायव्यवस्थेची अडचण आणि सोहराबुद्दीन खटल्यातील गंभीर वस्तुस्थिती या मुलाखतीतून अधोरेखित केली आहे.

सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक केसमधील सगळ्या हायप्रोफाईल संशयितांना जामीन कसा मिळाला? त्यात फक्‍त कनिष्ठ अधिकारीच कसे अडकले? प्रथमदर्शनी गुजरातचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी. जी. वंजारा, आयपीएस राजकुमार पांडियन आणि राजस्थान केडरचे दिनेश एम. एन. यांचा केसमधील सहभाग स्पष्टपणे जाणवत असतानाही त्यांची सुटका कशी झाली? असे प्रश्‍न माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी यावेळी उपस्थित केले. 

खटल्याशी संबंधित सर्व निर्णयांचा मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ठिपसेंची ही स्फोटक आणि विस्तृत मुलाखत एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आली आहे.

हायप्रोफाईल दोषींची सुटका, तडकाफडकी झालेल्या बदली, जामिनासंबंधीचे प्रश्‍न आणि साक्षीदारांवर साक्ष फिरवण्यासाठी असलेला दबाव या बाबींवर ठिपसेंनी आपल्या मुलाखतीमध्ये विशेष प्रकाशझोत टाकला. मार्च 2017 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाचे जज्ज म्हणून निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या केसवर भाष्य केले आहे. 

डी. जी. वंजारा यांना जामीन देण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती, मात्र सुप्रीम कोर्टाने इतर दोन अधिकार्‍यांना जामीन मंजूर केल्यामुळे केवळ वरच्या कोर्टाचा मान राखण्यासाठी आपण जामीन मंजूर केला, असा दावा अभय ठिपसे यांनी केला. मात्र, ऑर्डर पास करताना त्यात सगळ्या निरीक्षणांची नोंद केल्याचेही त्यांंनी म्हटले आहे.