Sun, May 19, 2019 22:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एल्गारच्या ५ जणांना अटक

एल्गारच्या ५ जणांना अटक

Published On: Aug 29 2018 12:28AM | Last Updated: Aug 29 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

नक्षलवाद्यांशी थेट संबंध आढळल्यानंतर एल्गार परिषदेचे आयोेजक सुधीर ढवळे व इतरांच्या अटकेनंतर मंगळवारी पुणे पोलिसांनी देशातील सहा शहरांमध्ये छापा टाकत तेलंगणातील प्रसिद्ध विचारवंत व कवी वरावरा राव (हैदराबाद), अरूण परेरा (रा. ठाणे, मुंबई), वर्णन गोंसलविस (रा. मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा (दिल्ली या पाच बड्या व्यक्तींना अटक केली आहे.  झारखंडातील रांची शहरात स्टॅन स्वामींच्या घराची झडती घेतली. या पथकांनी एकाचवेळी हैदराबाद, मुंबई, रांची, दिल्ली व हरियाणा या शहरांमध्ये छापे टाकले आहेत.  या पाचही जणांना पुण्यात आणून  बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

शनिवारवाड्यावर गेल्या वर्षी दि. 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद भरवण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. त्यात दगडफेक तसेच, अनेक वाहने जाळ्यात आली होती. दरम्यान एल्गार परिषदेच्या आयोजकांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिस या गुन्ह्याचा तपास करत होते. जून महिन्यात एल्गार परिषदेमागे नक्षलवाद्यांचे आर्थिक पाठबळ असल्याचे समोर आले होते. तसेच, नक्षलवाद्यांशी एल्गार आयोजकांचेही थेट संबंध असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर परिषदेचे आयोजक विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली) नागपूर येथील इंडियन असो. ऑफ पीपल्स लॉयर्सचे सरचिटणीस अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन (दोघे रा. नागपूर) व महेश सीताराम राऊत (रा. पिंपळरोड, नागपूर, मूळ रा. लाखापूर, जि. चंद्रपूर) यांना अटक केली होती.

 ढवळेंसह इतरांकडे तपास सुरू असताना महत्त्वाचे इमेल तसेच काही कागदपत्रे मिळाली आहेत. तर, एका पत्रातून राजीव गांधी यांच्यासारखीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट असल्याचे उघडकीस आले होते.

तपासात ढवळे व इतरांकडून संभाषण झाल्याची 250 ते 275 कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानुसार, या गुन्ह्याचा तपास सुरू होता. त्यावेळी आणखी काहीजण ढवळे, प्रा. सेन, अ‍ॅड. गडलिंग, राऊत यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले. तसेच, त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीनंतर यातील पाच जणांना अटक करण्यात आली. तर, रांची येथील स्टॅन स्वामींच्या घराची झडती घेण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले. 

वरावरा राव हे तेलंगणातील कवी आहेत. तसेच, ते विचारवंतही असून, बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला त्यांचे समर्थन आहे. त्याअनुषंगाने हैदराबादेमध्ये राव यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक केली गेली आहे. दरम्यान, पाच जणांकडे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी गेल्याचे सांगण्यात आले आहे. पाच जणांना पुण्यात आणले जात असून, बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.