Sat, Jul 20, 2019 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी जेरबंद

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी जेरबंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

शासनाच्या विविध खात्यात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घालणार्‍या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. भांडुप मध्ये कार्यालय थाटून बसलेल्या या टोळीतील पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कनिष्ठ लिपिक, हेल्पर, शिपाई, ड्रायव्हर, पोलीस या पदापासून ते थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या नोकरी देण्याचा दावा ही मंडळी देत होती. या प्रकरणी 61 जणांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहे.  त्यांना सुमारे दीड कोटी रुपयांना फसवल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.  

नाशिकमधील सटाणा तालुक्यातील नामपूर रोड येथे राहणारे दिलीप पाटील (63) या शेतकर्‍यास भांडूप येथील दिनेश लहारे याने मुलाला सरकारी नोकरीस लावण्याचे आश्वासन दिले होते. लहारे याने मंत्रालयामध्ये ओळख असल्याचे सांगून पाटील यांचा मुलगा मयुरसह अन्य मुलांना पाटबंधारे , सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवले होते. त्यापोटी त्यांच्याकडून  17 लाख 50 हजार रुपये घेतले होते. 

परंतु दीड वर्ष उलटून देखील लहारेने पाटील यांच्या मुलास नोकरी लावली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी भांडुप पोलिसांशी संपर्क केला. मात्र लहारे याने पैसे ठाण्यात घेतले असल्याने भांडुप पोलिसांनी त्यांना ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा प्रकार गंभीर असल्याने या घटनेचा तपास ठाणे गुन्हे शाखा युनिट एककडे सोपवण्यात आला होता. 

दरम्यान, तपासाची सूत्रे हाती घेताच गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी सापळा रचून लहारेला भांडूप रेल्वे स्टेशन जवळील त्याच्या स्नेहा कंप्युटर, स्टेशन प्लाझा या कार्यालयातून अटक केली. या प्रकरणी संपूर्ण टोळीच कार्यरत असल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार लहारे याचे साथीदार विनय दळवी (52, रा. धोबीआळी, ठाणे), शंकर कोळसे-पाटील (42, रा. भांडुप), रमेश देवरे (52, रा. पंचवटी, नाशिक), प्रवीण गुप्ता (29, रा. घोडबंदर रोड, ठाणे) यांना पोलिसांनी अटक केली. बी.ए. पर्यंत शिक्षण झालेल्या लहारे बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करायचा. त्याने आतापर्यंत 61 जणांकडून दीड कोटीहून अधिक रक्कम उकळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.