Sat, Nov 17, 2018 01:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडले महागात

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडले महागात

Published On: Feb 28 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 1:38AM
मुंबई : प्रतिनिधी

चेंबुरच्या एम वार्ड कार्यालयाजवळ थुंकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या तरुणाला दंड वसूल करण्याच्या बहाण्याने येथील गाड्या पार्किंगच्या निर्जनस्थळी नेत तिघांनी त्यांच्यावर लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत चेंबूर पोलीस तपास करत आहेत. 

चेंबुरच्या सेल कॉलनी रोडवर असलेल्या आदर्शनगरमध्ये रौफ काझी (27) हा तरुण कुटूंबासोबत राहातो. सोमवारी दुपारी वडील रफीक यांनी काही रक्कम अ‍ॅक्सीस बँकेच्या खात्यात भरण्यासाठी दिली. त्यानुसार दुपारी पावणेपाचच्या सुमारास रौफ हा त्याचा मित्र राजेश डाबी (22) याला सोबत घेऊन पालिकेच्या एम वार्ड कार्यालयासमोरील अ‍ॅक्सीस बँकेच्या शाखेत गेला. बँकेच्या प्रवेशद्वारावर रुपेश तळेकर हा मित्र भेटल्याने रौफ त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी थांबला. यावेळी रौफकडून पैसे घेऊन राजेश हा बँकेत पैसे भरण्यासाठी गेला.

गप्पा मारत असताना रुपेश जमिनीवर थुंकला असता येथे उपस्थित पालिकेचा क्लिनअप मार्शल अमर याने त्याला हटकले. थुंकल्यामुळे 200 रूपये दंड भरावा लागेल, असे अमरने सांगितले. रौफ आणि रुपेश यांनी अमरची माफी मागत पुन्हा थुंकणार नाही, असे सांगितले. मात्र अमरने त्यांना दमदाटी करत पैसे भरावेच लागतील असे बजावून तो येथील गाड्या पार्किंग करण्याच्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तिकडे गेला. तेथून ओरडून त्याने रुपेशला इधर आ तुझे भाईने बुलाया है, असे सांगितले. रुपेशला तेथेच थांबवून रौफ त्याच्यासोबत बोलण्यासाठी गेला. 

तू आमच्या माणसाला उलटसुलट बोलतोस, असा आरोप करत गणेश नावाच्या व्यक्तीने रौफला शिव्या घालण्यास सुरूवात केली. वाद विकोपाला जाताच गणेश याच्यासोबतच अमर आणि बाजुच्या खुर्चीत बसलेल्या युवराज रामराजे यांनी रौफला मारहाण सुरू केली. राजेश हा मदतीसाठी धावला असता तिघांनी त्यालाही बेदम मारहाण करुन तेथून पळ काढला. स्थानिकांनी दोन्ही जखमींना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. रौफ याच्या तक्रारीवरून चेंबुर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.