Thu, Jul 18, 2019 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वस्त्रोद्योग विकासासाठी १३०० कोटींची तरतूद

वस्त्रोद्योग विकासासाठी १३०० कोटींची तरतूद

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:33AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पीटीआय

वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने 1300 कोटींची तरतूद जाहीर केली. यामधून दहा लाख जणांना रोजगार पुरविण्यात येणार आहे. याचबरोबर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी देशातील पहिल्या रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू आदी प्रमुख राज्यांमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे. खादी ग्रामोद्योगाला चालना देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. याच उद्देशाने वस्त्रोद्योगाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 1300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.राष्ट्रीय कौशल्य पात्र आराखड्यानुसार वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. 

यानुसार वस्त्रोद्योग  व्यावसायिकांसह तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल. कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने वस्त्रोद्योगासाठी निधीचा पुरवठा करण्यात येणार आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असल्याने रोजगारवृद्धी करण्यात येणार आहे. पारंपरिक वस्त्रोद्योगांचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योगामध्ये उपजीविका करणारा मोठा घटक आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. 

गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी देशातील पहिल्या रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठाची स्थापना करण्याच्या प्रस्तावालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार या विद्यापीठास अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणार आहे. जुलै 2018 पासून या विद्यापीठात शैक्षणिक अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.

दरम्यान, ओबीसीसंदर्भातील उपवर्गीय आयोगाला मुदतवाढ देण्यासह सीमा सशस्त्र दलात अतिरिक्‍त पदे भरण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.