मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील धूम्रपानाचे प्रमाण बर्यापैकी घटले असल्याची दिलासादायक बातमी ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे(गॅटस-2)च्या 2016-17च्या अहवालानुसार समोर आली आहे. देशभर करण्यात आलेल्या या सर्व्हेेमध्ये 2009 ते 2017 पर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रात धूम्रपानामध्ये 3.8 टक्के घट झाली. महाराष्ट्राबरोबरच गोव्यामध्येही 4.2 टक्के इतकी धूम्रपानात घसरण झाली आहे. मात्र, या अहवालानुसार राज्यात बालकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण आढळून आले असून ही चिंताजनक बाब आहे.
गत सात वर्षांत राज्यात धूम्रपान करणारांच्या संख्येमध्ये बर्यापैकी घट झालेली आहे. पूर्वी धूम्रपानाची व्याप्ती 31.4 टक्के होती, आता ती 26.6 टक्क्यांवर आली आहे. गॅट्सच्या या अहवालानुसार 2010 या वर्षाशी तुलना करता तंबाखूचे सेवन करणार्या 15 ते 17 या वयोगटातील तरुणांमध्ये 2.9 टक्के वाढ होऊन ती आता 5.5 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. देशाच्या इतर भागांत मात्र तरुणांमध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण घटले आहे. सदर सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात 24 दशलक्ष म्हणजे 2 कोटी 40 लाख लोक तंबाखूचे सेवन करीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
हा सर्व्हे करताना देशातील 74,037 लोकांची मते विचारात घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 3141 लोकांचा समावेश होता. ऑगस्ट 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत करण्यात आलेल्या पाहणीत 1624 महिला व 1517 पुरुषांची मते विचारात घेण्यात आली.
त्यामध्ये प्रत्येक 3 पुरुषांमध्ये 1 जण तर, दर 6 स्त्रियांपैकी 1 महिला तंबाखूचे सेवन करताना आढळून आली. त्याचबरोबर तंबाखूचे सेवन सुरू करणार्या वयोगटाचा विचार करता तेही घटून 15 वर्षांपर्यंत खाली आल्याचे आढळले.