Thu, Apr 25, 2019 11:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे आयुक्तांचा शिवसेनेला दे धक्का 

ठाणे आयुक्तांचा शिवसेनेला दे धक्का 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

महापौर आणि पालिका आयुक्तांमध्ये पर्यायाने शिवसेनेमध्ये निर्माण झालेले वितुष्ट कमी करण्यासाठी सेनेच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असताना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आणखी  एक धक्का शिवसेनेला दिला आहे. ठाणे महापालिकेच्या 20 ते 25  महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी होणार असल्याने संजीव जयस्वाल पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना पक्षावर वरचढ ठरले आहेत. 

मागील काही दिवसांपूर्वी महापौर आणि आयुक्त यांच्यात पुन्हा वाद विकोपाला गेल्याचे चित्र होते. त्यात जलवाहतुकीचे सादरीकरणदेखील लोकप्रतिनिधींसमोर न करता पालिकेने परस्पर केल्याने त्याचा रागही शिवसेनेतील काही लोकप्रतिनिधींना आला होता. परंतु या रागामुळे ठाण्यात येणार्‍या अनेक प्रकल्पांवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आयुक्त महापालिकेत असेपयर्ंत शहरातील अनेक कामेदेखील मार्गी लागू शकतात, असे मत शिवसेनेतीलच काहींनी मांडले आणि पालकमंत्री पुन्हा या वादावर पडदा टाकण्यासाठी पुढे येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात येत्या काही महिन्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊ घातल्याने भाजपा या कामांवर आपला हक्का सांगू शकतो,  अशीही भीती शिवसेनेला वाटल्याने आयुक्तांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतांनाच या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ठाण्यात जम्बो कार्यक्रमांसाठी येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाण्यात 20 ते 25 कार्यक्रमांसाठी येणार असून त्यात सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणून मागील चर्चेत असलेल्या वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंटच्या कामाचे भूमिपूजन, ट्रॅफिक पार्कचे लोकार्पण, शहरात 12 ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या अर्बन रेस्ट रूमचे भूमिपूजन आदींसह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Tags : mumbai, mumbai news, projects bhoomipujan, hands, Chief Minister, Thane, Commissioner, shocks, Shivsena,


  •