होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बक्षिसाच्या पैशाच्या वादातून सफाई कामगाराची हत्या

बक्षिसाच्या पैशाच्या वादातून सफाई कामगाराची हत्या

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:01AMठाणे : प्रतिनिधी

पोर्टेबल टॉयलेट साफसफाई करणार्‍या कामगारांमध्ये बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशाच्या वादातून जोरदार भांडण झाल्यानंतर एका सफाई कामगाराने सहकारी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या भांडणात मारेकर्‍याने हल्ला रोखण्यास पुढे आलेल्या अन्य दोघा कामगारांवरही रॉडने हल्ला चढवला. मात्र दोघे घटनास्थळावरुन पळाल्याने त्यांचा जीव वाचला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आरोपी बाबासाहेब वाघमारे याला अटक केली आहे.

याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब वाघमारे व मयत सिद्धार्थ उर्फ सिंधू बराटे (26) हे दोघेही एकाच कंपनीत प्रोर्टेबल टॉयलेट लावण्याचे व सफाईचे काम करत होते. 3 व 4 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील रेमंड मैदानात एका सामाजिक संस्थेचा कार्यक्रम असल्याने या ठिकाणी 70 प्रोर्टेबल टॉयलेट लावण्याचे काम आरोपी बाबासाहेब, मयत सिद्धार्थ व त्यांच्या इतर सहकार्‍यांवर सोपवण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर आयोजकांनी आरोपी बाबासाहेब यास चांगले काम केले म्हणून काही पैसे बक्षीस म्हणून दिले. याच बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशावरून बाबासाहेब व सिद्धार्थ या दोघांत रविवारी सकाळी वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले.

त्यानंतर रविवारी रात्री 11.40 च्या सुमारास याच भांडणाचा राग मनात ठेवून बाबासाहेब आपल्या हातात लोखंडी रॉड घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आला व त्याने सिद्धार्थवर रॉडने जोरदार हल्ला चढवला. यावेळी सफाई काम करणारे सुशील भास्कर हिवाळे (26) व विमल हेमकुमार थापा (26) हे हल्ला रोखण्यास गेले असता आरोपीने त्यांच्यावरही हल्ला चढवला. मात्र सुशील व विमल दोघेही जीव वाचवून पळून गेले. तर सिद्धार्थ याच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीस काहीवेळातच अटक केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर करीत आहेत.