होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी हॉस्पिटल नियंत्रण कायदा लवकरच अंमलात आणणार

खासगी हॉस्पिटल नियंत्रण कायदा लवकरच अंमलात आणणार

Published On: Feb 15 2018 2:14AM | Last Updated: Feb 15 2018 2:01AMमुंबई : प्रतिनिधी

वैद्यकीय बिल भरण्यास असमर्थ असणार्‍या रुग्णाला डिस्चार्ज न देणे अथवा निधन झालेल्या रुग्णाचा मृतदेह देण्यास नकार देणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने राज्यभरातील सर्व खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा अंमलात आणला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी न्यायालयात दिली. मेडिकल क्षेत्रातील जाणकार व्यक्तिंशी याबाबत चर्चा सुरू असून क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्टअंतर्गत या नव्या कायद्याचा मसूदा तयार झाला असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचाराचे बिल भरता न येणार्‍या रुग्णांची रुग्णांलयांकडून केल्या जात असलेल्या अडवणुकीकडे लक्ष वेधनार्‍या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

यावेळी न्यायालयाने असा खासगी हॉस्पिटल्सवर कसे नियंत्रण आणणार असा सवाल उपस्थित करून राज्य सरकारला या संदर्भात गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.