Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आर्थर रोड कारागृहामध्ये कैद्याने केली आत्महत्या

आर्थर रोड कारागृहामध्ये कैद्याने केली आत्महत्या

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन बंदी असलेला साबिरअली गरीबुल्ला शेख (26) या कैद्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी घडली. 

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात राहात असलेल्या वसीउल्ला शेख उर्फ रसगुल्ला (41) या पोलीस खबर्‍याला गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सहा भंगार विक्रेत्या दलालांनी बेदम मारहाण करुन त्याची निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्यात रसगुल्ला याच्यासोबत त्याचा भाऊ अब्दुल आणि मित्र शमसुद्दीन शहा हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्न, कट रचणे, गंभीर दुखापत, मारहाण अशा विविध भादंवी कलमांन्वये गुन्हा दाखल करुन एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी शोहराबअली शहा (25) आणि मोहब्बतअली शहा (28) यांच्यासह साबिरअली याला बेड्या ठोकल्या होत्या. 

न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर साबिरअली याची रवानगी आर्थर रोड कारागृहामध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून तणावाखाली असलेल्या साबिरअली याने यापूर्वी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र रुग्णालयातील अन्य कैद्यांच्या मदतीने त्याला वाचविण्यात जेल कर्मचार्‍यांना यश आले. साबिरअली याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु सोमवारी सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.