Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किल्ले रायगडावरील वास्तुंना नवी झळाळी

किल्ले रायगडावरील वास्तुंना नवी झळाळी

Published On: Mar 25 2018 1:03PM | Last Updated: Mar 25 2018 1:03PMरायगड : विशेष प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड संवर्धन मोहिमेला आता प्रारंभ झाला आहे. मुख्य राजवाड्यासह किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी भिंतींची खुदाई करुन दगडी भिंती नव्याने बांधल्या जाणार आहेत. एकूण 606 कोटींचा आराखडा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून, यातील 60 कोटी निधी संवर्धन समितीकडे उपलब्ध झाला आहे. यातून किल्ल्याची डागडुजी सुरु झाली आहे. 

ब्रिटीश सरकारच्या काळात या अभेद्य किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर खुदाई झाली. सोन्याच्या मोहापायी ब्रिटीश सरकारने किल्ल्याची खुदाई करुन हा अभेद्य आणि सुरक्षित किल्ला बेरुख केला. यामुळे मराठी राज्याची राजधानी असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा असलेल्या या किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले. या वास्तू पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. 

खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या देखरेखीखाली हे काम सुरु झाले असून, किल्ले रायगड संवर्धनाबरोबरच रोपवे ची क्षमता वाढविणे, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे पूर्ननिर्माण असे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि अखंड भारताचं स्फुर्तीस्थान असलेल्या किल्ले रायगडावरील जिर्न होत चाललेल्या ऐतिहासिक इमारतिंना आता नवी झळाळी येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागच्या वतिने रायगडवरील शिवाजी महाराज यांची समाधी आणि जगदिश्‍वराच्या मंदिराच्या केमिकल वॉश या कामाला सुरवात करण्यात आली असून, तब्बल 17 वर्षानंतर हे काम होत असल्याने रायगडाला पुन्हा सुवर्णदिन आले आहेत.

किल्ले रायगडाला असलेले अनन्यसाधारण महत्व पाहता सरकारणे रायगड महोत्सव, महाड-रायगड राष्ट्रीय महामार्ग, रायगड संवर्धन आणि रायगड प्राधिकरण या माध्यमातून किल्ले रायगड व परिसराच्या विकासाचा 606 कोटींचा महत्वाकांशी कार्यक्रम आखला आहे. मात्र, प्रत्यक्षात या कामाला सुरवात झाली नसली तरी केंद्राच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षीत राहिलेल्या किल्ले रायगडला या विभागाने विषेश महत्व दिले आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून गडावर विविध कामांना सुरवात झाली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान शाखा औरंगाबादच्या वतिने पुरातन इमारतीच्या केमीकल वॉश या कामाला सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये इमारतीवरील शेवाळ काढने, शेवाळ पुन्हा रुजू नये यासाठी बाह्य भागांवर बायोसाईड कोटींग, वॉटर रिप्लेंट कोटींग, दगडाच्या मजबुतीसाठी व मुळ ढाच्यासाठी स्पेशल केमिकल ट्रीटमेंट आणि सिलीकॉनचा वापर या पध्दतीचे हे काम आहे. किल्ले रायगडावर शिवसमाधी, जगदिश्‍वर मंदिर, या मधील छोटा नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई मंदिर, राजदरबारा बाहेरील मोठा नगारखाना, मेघडंबरी, राण्यांचे महाल, दोन मनोरे, वाघदरवाजा, महादरवाजा इत्यादी पुरातन इमारती आहेत. या सर्व इमारतींची उन, वारा व मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पडझड होत आहे. तसेच वातावरण व त्यातील प्रदुषणाने इमारतींचे दगड जिर्न होत आहेत.

उत्तर भारतीयांना किल्ले रायगड बाबत असलेल्या अनास्थेमुळे किल्ले रायगड भारतीय पुरातत्व विभागाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला होता. दरम्यानच्या काळात या विभागाच्या विज्ञान शाखेचे सहाय्यक अधिक्षक अनिल पाटील रायगडावर आले असता, गडावरील जिर्न होत चाललेल्या पुरातन वास्तु त्यांच्या निदर्शनास आल्या. ही बाब त्यांनी वरिष्ठपदाधिकारी उपाधिक्षक श्रीकांत मिश्रा यांच्या लक्षात आणुन दिल्या नंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली रायगडावरील शिवसमाधी आणि जगदिश्‍वर मंदिराच्या केमिकल वॉश या कामाला तात्काळ सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या दोन वास्तुचे काम होणार असून, पुढील टप्प्यात टप्प्या-टप्प्याने  इतर इमारतींचे काम पूर्ण होणार आहे. हे संपूर्ण काम पुरातत्व विभाच्या तज्ञांकडून विभागाने उपलब्ध करुण दिलेल्या निधीतून होत आहे. या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता सध्यातरी केमीकल वॉश एवढ्यापुरतेच हे काम मर्यादित असून, गडावरील पुरातन इमारतींच्या ढासळणाऱ्या अवशेषांची दुरुस्ती होणार नसल्याचे समजते. रायगड संवर्धन प्राधिकरणच्या कोणत्याच कामांना प्रत्यक्षात सुरवात झाली नसली तरी प्रधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी गडावरील पाणी व तलावांची दुरुस्ती या महत्वाच्या कामांना लवकरच सुरवात होणार असल्याचे, नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान सांगितले.

 

‘‘रायगडावरी पुरातन वास्तू संरक्षित ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे ही सर्वांनची जबाबदारी आहे. हे काम होत असताना मुळच्या ढाच्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच केमिकल वॉश या प्रक्रीयेने दगडांच्या भेगा व चिरांमध्ये अडकलेली धुळ आणि शेवाळ स्वच्छ होणार आहे व त्यामुळेच काही ठिकाणी या इमारतींच्या दगडातील भेगा दृष्य होणार आहेत. मात्र, यामध्ये सिलीकॉन प्रोसेस केल्याने ह्या भेगा नष्ट होवून वास्तुंचे आयुष्यमान वाढणार आहे. हे काम दोन आठवड्यात पुर्ण होईल. ’’


अनिल पाटील, सहाय्यक अधिक्षक विज्ञान शाखा, भारतीय पुरातत्व आणि संशोधन विभाग

 

Tags : raigad fort, Mahad, Raigad district, Maharashtra,  Maratha king, Chhatrapati Shivaji Maharaj, preservation