Wed, Mar 20, 2019 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत गरोदर पत्नीची पतीकडून हत्या

भिवंडीत गरोदर पत्नीची पतीकडून हत्या

Published On: Mar 21 2018 9:14AM | Last Updated: Mar 21 2018 9:14AMभिवंडी : वार्ताहर

पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करून तिच्या शोधासाठी गणेशपुरी पोलिसांकडे तगादा लावणार्‍या पतीनेच गरोदर पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराशेजारील शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील आनगाव येथे उघडकीस आला आहे. कल्पेश ठाकरे असे या पतीचे नाव असून, त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. गणेशपुरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

अनगाव या गावातील कल्पेश ठाकरे याने 12 मार्च रोजी आपली गरोदर पत्नी माई घरातून निघून गेल्यासंदर्भात गणेशपुरी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. याबाबत पोलीस यंत्रणा तपास करीत असताना तब्बल नऊ दिवसांनंतर स्वतः कल्पेश यानेच पोलिसांना आपण पत्नीची अंबाडी येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह अनगाव येथील आपल्या घरामागील शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी होत अंबाडी येथील पोलीस उपअधीक्षक काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर ढोबे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पंच म्हणून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला व तो  शवविच्छेदनाकरीता इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनगाव येथील कल्पेश ठाकरे याचे अडीच वर्षांपूर्वी मुंबई येथील बारबाला माई हिच्यासोबत प्रेमसंबंध जुळून आल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला नोंदणी पद्धतीने केलेल्या लग्नास कल्पेशच्या कुटुंबीयांनी संमती दिल्याने कल्पेश व माई यांचे धुमधडाक्यात लग्न अनगाव येथे लावून देण्यात आले. परंतु माईचा पूर्वेतिहास पाहता ती मद्यपी व सिगारेटची व्यसनाधीन असल्याने त्यांच्यात बर्‍याचदा वाद होत होता. त्यातच आठ महिन्यांची गरोदर असताना तिला दारू पिण्यास घरातील सासू सासरे विरोध करू लागले. यात तिने पती कल्पेशकडे वेगळे राहण्यासाठी हट्ट धरला असता कल्पेश व माई हे दोघे अंबाडी येथे वेगळे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले.

याठिकाणी त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाल्याने कल्पेशने गरोदर पत्नी माई हिची गळा आवळून हत्या केली व त्याच रात्री अनगाव येथील आपल्या घराच्या मागील बाजूच्या शेतजमिनीत तिचा मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर ढोबे हे करीत आहेत.