Wed, Aug 21, 2019 19:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार परिचारकांचे निलंबन मागे नको तर बडतर्फ करा 

आमदार परिचारकांचे निलंबन मागे नको तर बडतर्फ करा 

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 9:26PMमुंबई : प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांचा अपमान करणार्‍या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा अशी मागणी शिवसेना अ‍ॅड.आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी देखील त्यास पाठिंबा देत निलंबन मागे घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्याची सूचना केली. सभापती रामराजे नाईक-निंबाळर यांनी सभागृहात मंजूर झालेल्या ठरावास अशाप्रकारे स्थगिती देता येणार नसल्याचे स्पष्ट करत, एखाद्या सदस्यासंदर्भात ठराव आणायचा असेल तर तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. त्यानुसार आमदार परब सोमवारी विधानपरिषद सभागृहात परिचारक यांना बडतर्फ करण्याचा ठराव सभागृहात मांडणार आहेत.

परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी विधानपरिषद सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अनिल परब यांनी परिचारक यांनी देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांचा अपमान करणारे विधान केले आहे. या संदर्भात सभागृहात चर्चा करताना सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. पण यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर त्यांच निलंबन मागे घेण्यात आले. सभागृहातील गोंधळात याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला हे चुकीचे असल्याचे सांगत परब यांनी निलंबन रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली.

देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात समाज माध्यमावर लिहल म्हणून पोलीस शिपाई निलंबित होतो. तर देशाच्या सैनिकांचा अपमान करणार्‍यांच निलंबन का नाही? असा प्रश्न त्यांनी केला. परिचारक यांना बडतर्फ करून त्या ठिकाणी दुसरा उमेदवार द्या, त्याला बिनविरोध निवडून देऊ असे परब म्हणाले. विरोधी पक्षाचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी परब यांनी मांडलेला मुद्या योग्य असून परिचारकांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावर मतदान घेण्याची सूचना केली. तर हेमंत टकले यांनी परिचारक यांच्या प्रकरणात नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशीनुसार जरी सभागृह नेत्यांनी निलंबन मागे घेण्याचा ठराव मांडला असला तरी त्यावर निर्णय करायचा अधिकार सर्वाभौम सभागृहाचा असल्याचे सांगत परब यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले.

सभागृहात यासंदर्भात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सभापती नाईक-निबांळकर यांनी परिचारक यांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने संसद तसेच अन्य राज्यांच्या विधानसभेतील आत्तापर्यंतच्या निर्णयांचे अवलोकन करूनच निलंबन मागे घेण्याबाबत अहवालात शिफारस केली होती. त्यानुसार सभागृहात ठराव मांडण्यात आला. विरोधी पक्ष किंवा एखाद्या सदस्यास ठराव मांडायचा असेल तर तसा प्रस्ताव देण्यात यावा अशी सूचना केली. त्यावर अनिल परब यांनी सोमवारी परिचारक यांच्या बडतफीसंदर्भात  सोमवारी ठराव मांडणार असल्याचे सांगितले.