होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘टाटा’ कृपेने टळले मुंबईकरांवरील वीजसंकट

‘टाटा’ कृपेने टळले मुंबईकरांवरील वीजसंकट

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:17AMमुंबई : वार्ताहर

कळवा येथील एमएसईटीसीएलच्या इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये (आयसीटी-2) तांत्रिक समस्या आल्याने मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या ग्रिडमध्ये ट्रिपिंग होऊनही आर्थिक राजधानीतील विमानतळ, हजारो कार्यालये, रेल्वे, रुग्णालये, सरकारी कार्यालये लाखो मुंबईकरांना पुन्हा एकदा मोठ्या वीजसंकटापासून वाचवण्यात आले. टाटा पॉवरमुळे त्यांचा वीजपुरवठा फार काळ खंडित झाला नाही. 

टाटा पॉवरने आपल्या ट्रॉम्बे व हायड्रोज केंद्रांतील वीजनिर्मिती वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. ही दोन्ही केंद्रे शुक्रवारी पूर्ण क्षमतेने काम करत होती. हे संकट अद्याप दूर झाले नसल्याने शनिवारीही वीजनिर्मिती केंद्रांनी वीजनिर्मितीचे काम सुरूच ठेवले. टाटा पॉवरने खोपोली, भिवपुरी आणि भिरा या जलविद्युत निर्मिती केंद्रांमध्ये वीजनिर्मिती सुरू करून 144 मेगावॉट ते 400 मेगावॉट वीज तातडीने उपलब्ध करून दिली. यामुळे कळव्यातील दुसर्‍या आयसीटीवर येणारा ताण कमी करणे शक्य झाले. संपूर्ण दिवस पूर्ण क्षमतेने काम करून 450 मेगावॅट विजेची निर्मिती केली. 

सामान्यपणे जलविद्युतनिर्मिती रात्री पूर्णपणे थांबवली जाते आणि दिवसाही 8 ते 10 तास वीजनिर्मितीची योजना असते. पावसाळा अजून सुरू झाला नसल्याने टाटा पॉवरच्या तलावांमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. तरीही नियोजित 4.8 दशलक्ष एककांऐवजी 9.1 दशलक्ष एककांची निर्मिती टाटा पॉवरने केली. ट्रॉम्बे केंद्र 7 मध्येही आरएलएनजी इंधनाचा आपत्काळासाठी ठेवलेला साठा वापरून 80 मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती केली.

ट्रॉम्बे येथील सर्व युनिट्स सुरू ठेवून 900 मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य पूर्ण केले. कोळशापासून विजेची निर्मिती करणार्‍या युनिट 5 मधून 500 मेगावॅट, वायूपासून वीजनिर्मिती करणार्‍या युनिट 7 मधून पूर्ण क्षमतेने 180 मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच कोळशापासून वीजनिर्मिती करणार्‍या युनिट 8 मधून 250 मेगावॅट वीजनिर्मिती करून टाटा पॉवरने हे उद्दिष्ट पूर्ण केले.

बोरिवलीकडे अतिरिक्त 150 मेगावॅट वीज वळवण्यासाठी टाटा पॉवरच्या बोरिवली व साकी उपस्थानकांमध्ये काही नेटवर्कविषयक बदल करण्यात आले. अन्यथा, या भागातील भारनियमनाचा कालावधी वाढला असता. 220 किलोव्होल्टच्या सालसेट्टे-बोरिवली लाइन्स आणि 220 टीपीसीच्या साकी-रिलायन्स इन्फ्रा साकी लाइन्स खुल्या ठेवण्यात आल्या. त्यामुळे बोरिवलीकडे अतिरिक्त 150 मेगावॅट वीज वळवण्यात मदत झाली. ट्रॉम्बे सालसेट्टे प्रकल्पाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेली 110 किलोव्होल्टची धारावी-विक्रोळी लाईन आणि 110 किलोव्होल्टचीच धारावी-पवई लाईन सकाळी पुन्हा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे विक्रोळी व पवईवरील भार (एकूण सुमारे 120 मेगावॅट) धारावीकडे वळवण्यात मदत झाली. पर्यायाने कळव्याच्या एमएसईटीसीएल आयसीटींवरील भाराचे नियंत्रणही करणे शक्य झाले.