Thu, Apr 25, 2019 16:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र?

राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र?

Published On: Aug 03 2018 8:24AM | Last Updated: Aug 03 2018 8:54AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र की स्वतंत्र्यरीत्या घ्यायच्या, याबाबत राज्य सरकारकडून येत्या चार महिन्यांत केंद्र सरकारला अहवाल पाठविला जाणार आहे. वारंवार होणार्‍या निवडणुकांमुळे विकासकामांवर होणारा परिणाम आणि निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठी एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकार आग्रही आहे. राज्य सरकार कोणती शिफारस करते, याबाबत उत्सुकता आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत येत्या चार महिन्यांत अहवाल पाठविण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती राज्यातील विविध पक्ष आणि प्रशासन आणि संबंधितांशी चर्चा करून आपला अहवाल देणार आहे. हा अहवाल कोणत्याही पक्षाचा फायदा-तोटा विचारात न घेता दीर्घकालीन विचार करून तयार करण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात, असा विचार केंद्रात सुरू आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांतील निवडणुका या पुढच्या वर्षी होत आहेत. या निवडणुका मुदतपूर्व घेऊन त्या लोकसभेसोबतच घ्याव्यात यावर विचार सुरू आहे. त्याला राज्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला, तर दोन्ही निवडणुका या एकत्र होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक ही लोकसभेसोबत होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता राज्य सरकार केंद्राला कोणता प्रस्ताव पाठविते, याबाबत उत्सुकता आहे.