Mon, Aug 19, 2019 13:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल जाणार ९० रुपयांवर?

पेट्रोल जाणार ९० रुपयांवर?

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:21AMमुंबई : वृत्तसंस्था

सीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या इंधनाचे दर कमालीचे वाढण्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे देशातही पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या 72 डॉलर प्रतिबॅरल असलेले कच्चे तेल 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्याने ही स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.  

मुंबईसारख्या महानगरात सध्या पेट्रोलचा भाव 80 रुपये प्रतिलिटर आहे. आखाती देशातून भारत तेलाची आयात करतो. अमेरिका-सीरिया प्रकरणात इराण सीरियाच्या बाजूने आहे. त्यामुळे अमेरिकेकडून इराणवर निर्बंध लागू होण्याची चिन्हे आहेत. आयात महागल्यास डॉलर वधारण्याची आणि रुपया घसरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोलचा भाव 90 रुपये प्रतिलिटरवर जाईल, असा अंदाज जे. पी. मॉर्गन या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेने वर्तविला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेलच्या भावावर होतो. इंधन महागल्यास वित्तीय तूट वाढते. याचा अंतिम परिणाम महागाईवर होत असल्याने नजीकच्या काळात महागाई वाढण्याची चिन्हे आहेत.

Tags : Mumbai, petrol price, flowing, 90 rupees, possibility, Mumbai news,