Wed, Feb 20, 2019 19:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परळ पूलबंदी शिथिल होण्याची शक्यता

लोअर परळ पूलबंदी शिथिल होण्याची शक्यता

Published On: Jul 24 2018 1:13AM | Last Updated: Jul 24 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी

लोअर परळ येथील पूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीच्या तज्ज्ञांनी दिल्यामुळे, तो पूल पादचार्‍यांसह सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे आणि वाहतूक विभागाने घेतला. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या नेतृत्वाखाली तातडीची बैठक बोलावण्यात आलेली असल्याचे आमदार अजय चौधरी आणि सुनील शिंदे यांनी सांगितले. लोअर परळ पुलाबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांची सोमवारी दुपारी भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. 

अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे, पालिका आणि आयआयटीच्या तज्ज्ञांनी रेल्वेच्या हद्दीतील सर्व पुलांची पाहणी केली. या पाहणीनंतर हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीच्या तज्ज्ञांनी  रेल्वे आणि महापालिकेला दिला. त्यानुसार परेल येथील हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचार्‍यांसाठी बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची अजय चौधरी आणि सुनील शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान संबंधित पूल कोण बांधणार याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी असलेल्या पुलांमध्ये याचा समावेश होत असल्याने याबाबत तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापौर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य पुल अभियंता ( रेल्वे), मुख्य पुलअभियंता (महापालिका), वाहतूक पोलीस, आणि उर्वरित संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले. 

गणेशोत्सवासाठी काही दिवसच उरले आहेत. अनेक गणेशमूर्ती कार्यशाळा याच भागात असल्याने मूर्ती मंडपाकडे तसेच विसर्जन मिरवणूकाही याच पुलावरुन मार्गस्थ होत असतात. धोकादायक असल्याकारणाने पुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. मात्र सध्या या पुलावरुन पादचारी, हलकी वाहने आणि आपत्कालीन वाहनांसाठी परवानही मिळावी यासाठी मंगळवारी महापौरांसोबत सर्व संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले.