Sat, Mar 23, 2019 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ विक्रीवर बंदीची शक्यता 

सिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ विक्रीवर बंदीची शक्यता 

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:21AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा  

सिनेमा सुरू असताना सिनेमागृहात होणार्‍या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र गृहविभाग गांभीर्याने विचार करीत आहे. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिल्यास सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे प्रतिज्ञापत्र नुकतेच महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर लगेचच नव्या प्रस्तावावर सरकारने विचार सुरू केला आहे. 

सिनेमागृहात नियमांचे उल्‍लंघन करणार्‍यांविरोधात कारवाईची मागणी आम्ही केली आहे, असे याचिकाकर्ते जितेंद्र बक्षी  यांचे वकील आदित्य प्रताप यांनी सांगितले. त्यांनी सिनेमागृहात विशेषत: बहुपडदा चित्रपटगृहात होणार्‍या खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

सिनेमा सुरू असताना होणार्‍या खाद्यपदार्थांच्या विक्रीवेळी नियमांचे उल्‍लंघन होते. महाराष्ट्र सिनेमा (रेग्युलेशन) रुल्स 1966 अनुसार जेव्हा सिनेमा सुरु असतो तेव्हा खाद्यपदार्थ विक्रीस मनाई करण्यात आली आहे. यातील नियम 121 अ नुसार सिनेमा सुरू असताना कोणताही खाद्यपदार्थ तसेच शीतपेय यांची विक्री किंवा पुरवठा करण्यास मनाई आहे, असे गृहविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

सर्वसामान्यपणे बहुपडदा चित्रपटगृहांत सिनेमाच्या तिकिटासोबत खाद्यपदार्थांची कॉम्बो ऑफरमध्ये विक्री केली जाते. आणि खाद्यपदाथार्ंचा पुरवठा सिनेमा सुरू असतानाच केला जातो. अनेक सिनेमागृहांत आसनाजवळच एक बटण असते जे दाबल्यानंतर खाद्यपदार्थांची ऑर्डर देता येते. ही बाब सर्वात आक्षेपार्ह आहे, कारण त्यामुळे इतर चित्रपटरसिकांना व्यत्यय येत असतो. 

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काय निर्णय दिला जातो, याची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे गृहविभागाच्या एका अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. याचिकेवरील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.  

दरम्यान, आपल्याकडून कोणत्याही नियमाचे उल्‍लंघन केले जात नाही, असा दावा चित्रपटगृहचालकांनी केला आहे. चित्रपट रसिकांना त्यांच्या आसनाकडे खाद्यपदार्थ दिले जातात हे खरे आहे, मात्र ते मध्यांतराला दिले जातात, त्याला कायद‍्याने परवानगी आहे. कोणतेही चित्रपटगृह नियमाचे उल्‍लंघन करीत असेल, असे मला वाटत नाही, असे मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशन ऑफ इंडियााचे दीपक अशर यांनी सांगितले.