होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळचा पूल नागरिकांसाठी खुला

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळचा पूल नागरिकांसाठी खुला

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी

मंगळवारपासून बंद असलेला लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल अखेर शुक्रवारपासून  पादचार्‍यांसाठी खुला करण्यात आला असून वाहनांसाठी मात्र बंदी कायम ठेवण्यात आली आहे. 24 जुलैपासून, पूल बंद झाल्यापासून पुलाखालून जाणार्‍या नागरिकांना वाट मिळणेही कठीण झाले होते.प्रवाशांच्या पूल सुरू करण्याच्या मागणीसोबत अनेक पक्षांनी पूल पादचार्‍यांसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच महापालिकेने पूर्वकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी डिलाईल रोड ते लोअर परळ स्टेशनपर्यंत पूल खुला केला आहे. पूल सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  

पूल बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. पुलाच्या तपासणीनंतर पूल धोकादायक असल्याचे  प्रशासनाने जाहीर केले. पाहणीनंतर मंगळवारपासून  लोअर परळ स्टेशनबाहेरचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी आणि पायी चालणार्‍यांसाठीही पूर्णत: बंद करण्यात आला होता.  पुलाचे काम न करताच हा पूल पादचार्‍यांसाठी सुरू कसा केला अशी विचारणाही काही नागरिक करत आहेत. तसेच लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही नागरिक करत आहेत. पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे एल्फिन्स्टन रोड तसेच दीपक चित्रपटगृह व महालक्ष्मी स्थानकाजवळ वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. बस रूटमध्येही बदल करण्यात आले आहेत.