होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजकीय दबावाला आयुक्तांनी बळी पडू नये

राजकीय दबावाला आयुक्तांनी बळी पडू नये

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 2:02AMमुंबई : प्रतिनिधी 

महापालिका आयुक्‍तांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम करावे, असा सल्‍ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अग्निसुरक्षा पालन कक्ष स्थापन केला असून या कक्षासाठी पालिकेने नवीन 28 वाहने खरेदी केली आहे. या वाहनांचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईचे  महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र येथे पार पडले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. 

अग्निसंरक्षक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना महापालिका अधिका-यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोणीही अनधिकृत गोष्टीला खतपाणी घालणार नाही याची प्रत्येक लोकप्रतिनिधींनी काळजी घेणे आवश्यक असून माझ्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा जीव महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कायद्याची कडक अंमलबजावणी केली तरच याप्रकारच्या आगीच्या दुर्घटना टाळता येतील, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे धडे द्यावे तरच उद्याचे जागृत नागरिक तयार होतील अशी सूचनाही त्यांनी केली.

अग्निसुरक्षा पालन कक्षाद्वारे विविध आस्थापनांच्या करण्यात येणार्‍या तपासणीमध्ये नागरिकांचे सहकार्य मिळाले तरच अग्निसंरक्षक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बृहन्मुंबई महापालिकेला शक्य होणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.