होमपेज › Mumbai-Thane-Raigad › या पोलीस ठाण्यांची पायरी चढताच निघतो तुमचा फोटो!

या पोलीस ठाण्यांची पायरी चढताच निघतो तुमचा फोटो!

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी

पोलीस ठाण्यात अनेकदा काय चालतं याची भनक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाही लागत नाही. सर्वसामान्य माणूस तर पोलीस ठाण्याची पायरी चढणं टाळतोच; पण नवी मुंबई पोलिसांनी आता अशी प्रणाली(सिस्टीम) कार्यान्वीत केलेय, की ती पोलीस ठाण्याची पायरी चढल्यापासून बाहेर पडेपर्यंत अभ्यागतांवर लक्ष ठेवण्याबरोबरच ते कोणत्या कामासाठी आले होते, याचं रेकॉर्डही ठेवते. त्यामुळे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या तक्रारीचे काय झाले, हे एका क्‍लीकवर कळणार आहे. ‘व्हीजिटर मॉनिटरींग सिस्टीम’ या नावाने ही प्रणाली ओळखली जात असून गत 15 दिवसांपासून ती वाशी, नेरूळ, पनवेल तालुका व न्हावा शेवा पोलीस ठाण्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे. 

पायलट प्रोजेक्ट म्हणून कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये पोलीस ठाण्याची पायरी चढणार्‍या अभ्यागताला पहिल्यांदा वेबकॅमेर्‍याला सामोरे जावे लागते.  हे वेबकॅमेरे पोलीस ठाण्यात पाऊल ठेवणार्‍या अभ्यागताचे छायाचित्र काढून सिस्टीमध्ये सेव्ह करतात. त्यासोबत संबंधीत व्यक्तीची माहिती म्हणजे पोलीस ठाण्यात येण्याचे कारण, पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्याची वेळ आदी बाबीही रेकॉर्ड केल्या जातात. याद्वारे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना पोलीस ठाण्यात नेमके काय सुरू आहे, याची माहिती मिळते व त्यांची नजर राहते. 

ही प्रणाली पोलीस आयुक्त कार्यालयातही बसवण्याचा विचार सुरू असल्याचेपोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) तुषार दोशी यांनी सांगितले. पोलीस अधिकारी या प्रणालीचा आढावा पंधरा दिवसांतून एकदा घेतील व संबंधीत व्यक्तींना त्यांच्या कामाचा स्टेटस काय आहे, हे कळवतील अशी माहितीही दोशी यांनी दिली.  ही प्रणाली अजून प्राथमिक अवस्थेत असून पोलीस व पोलीस अधिकारी त्याबाबतचे ज्ञान घेण्यात मश्गुल आहेत. या सिस्टीमचे आरटीआय कार्यकर्त्यांनीही स्वागत केले आहे.