Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईत पोलीस अधिकारी, वकिलांची मिलीभगत? 

वसईत पोलीस अधिकारी, वकिलांची मिलीभगत? 

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 1:46AMनालासोपारा : वार्ताहर

वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांतील काही पोलीस अधिकारी आणि वकील यांची मिलीभगत असून त्याची ऑडिओ क्लिप ज्येष्ठ वकिलांना मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्‍लिपशी संबंधित पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी वकील संघटनांनी केली आहे. मात्र, या आरोपांचा पोलीस अधीक्षकांनी इन्कार केला असून कोणीही अफ वा पसरवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तालुक्यातील दलालीसाठी चटावलेले काही मध्यस्थ आणि कमिशन मिळतय म्हणून ठराविक वकिलांनाच काम किंवा केसेस देणारे पोलीस अधिकारी आणि त्यांना कमिशन देणारे संबंधित वकील यांच्यामुळे आपली न्यायव्यवस्था अडचणीत आली आहे, असा आरोप बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.नोव्हेल डाबरे यांनी केला. ते म्हणाले, तालुक्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे न्यायासाठी धडपडणारे पक्षकार आणि न्यायालयात काम करणारे काही ज्युनियर वकील कमालीचे त्रस्त झाले आहेत.  वसई न्यायालयात काही ठराविक वकील आणि त्यांचे दलाल यांची फौजदारी स्वरुपाच्या कामात अक्षरशः मक्तेदारी सुरू आहे. पोलीस ठाण्यात तपासी अधिकारीच आरोपींच्या नातेवाईकांना ठराविक वकिलांची नावे सांगतात व फोन लावून देतात. एवढेच काय अमूक वकिलाकडे गेलात तरच तुमचे काम होईल, अशी भीतीही घातली जात असल्याचे डाबरे म्हणाले.

या मिलिभगतचा गंभीर परिणाम वसई न्यायालयातील शेकडो वकिलांच्या व्यवसायावर झाला आहे. न्यायासाठी धडपडणार्‍या नागरिकांना त्यांच्या त्या विशिष्ट परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हे रॅकेट पक्षकारांना लुटत असून अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे. या सर्व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाजाला योग्य वळण लागावे म्हणून आता काही ज्येष्ठ वकील, वकिलांच्या संघटनांचे पदाधिकारी आक्रमक पवित्रा घेत आहेत. ही चुकीची पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना साकडे घातले आहे. याबाबत उप विभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आदींना निवेदनही देण्यात आले, मात्र तरीही परिस्थितीत कोणताही फरक पडला नाही. या गंभीर बाबीकडेे राज्य शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी  मागणी वकील संघटनांकडून होत आहे. हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे नेण्याची तयारीही वकिलांनी चालवला आहे. यासाठी प्रसंगी आंदोलन, धरणे, लाक्षणिक उपोषण आदी लोकशाही मार्गांच्या आंदोलनाचा अवलंब केला जाईल, अशी माहिती नोव्हेल डाबरे यांनी दिली.

पालघर पोलीस अधीक्षक  मंजुनाथ सिंगे यांनी मात्र या सर्व अफ वा ठरवल्या. ते म्हणाले, न्यायालयात वकिलांनी दिलेल्या अर्जात कोणतेही तथ्य नसून कोणतिही मिलीभगत नसते. कोणाकडे पुरावे असतीलच तर, त्यांनी ते सादर करावेत असे आव्हानही  त्यांनी दिले.