Mon, Apr 22, 2019 12:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिद्रेंचा खून झाल्याचे धागेदोरे

अश्‍विनी बिद्रेंचा खून झाल्याचे धागेदोरे

Published On: Dec 08 2017 7:48PM | Last Updated: Dec 08 2017 7:48PM

बुकमार्क करा

पनवेल : विशेष प्रतिनिधी

कळंबोली पोलिस स्थानकात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून बदली होऊन आलेल्या अश्‍विनी बिंद्रे यांची हत्या झाल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्या घरात रक्‍ताचे डाग आणि केस सापडले आहेत. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याने आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत पोलिस तपासाला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्याला गुरुवारी अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे निलंबन होण्याची शक्यता वाढली आहे.

सांगली पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळे याची हत्या व मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार ताजा असतानाच आता नवी मुंबईमध्ये पोलिस दलातील नवे थरारनाट्य उघड झाले आहे. बिंद्रे यांच्या हत्येच्या संशयामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दीड वर्षांपूर्वीपासून अश्‍विनी बिंद्रे या बेपत्ता होत्या. त्या मूळच्या आळतेच्या (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असून आळते येथील राजकुमार गोरे यांच्याशी त्यांचे लग्‍न झाले होते. त्यावेळी त्या रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली नवी मुंबई येथे झाली होती.

बेपत्ता होण्याअगोदर त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मीरा रोडला मिळाले होते. येथेच अभय कुरूंदकर कार्यरत असल्याने त्याच्यावर संशयाची सुई होती. अश्‍विनी यांना मारत असल्याची क्‍लिप अश्‍विनी यांचे पती राजकुमार गोरे यांनी पोलिसांना दिल्यानंतर कुरूंदकर याला पनवेलचे एसीपी प्रकाश निलेवार यांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्याला शुक्रवारी पनवेल न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

दीड वर्षे एखादी पोलिस अधिकारी बेपत्ता राहते यावरून त्यांची हत्या झाल्याचा संशय येत होता. मात्र, कळंबोली येथील निवासस्थानी  अश्‍विनी यांचे केस आणि रक्‍ताचे डाग सापडले. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. पोलिस अधिकार्‍यानेच महिला पोलिस अधिकार्‍याची हत्या केली का व या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस खाते घेत असून त्याच्या मुळाशी जाण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

घराचा रंग का बदलला?
अश्‍विनी गायब झाल्यानंतर अभय कुरूंदकर याने भाईंदरमधील घराचा रंग बदलला. काही आक्षेपार्ह घटना घडल्याने रंग बदलला का, याबाबत पोलिसांनी न्यायालयासमोर संशय व्यक्‍त केला आहे. त्याचबरोबर घरातील रंग, भिंतीचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पाठवल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी अश्‍विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे अभय याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, राज्यातील आणि परराज्यातील विपश्यना केंद्रात तपास केला असता अश्‍विनी यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्याने संशयाची सुई अभय कुरूंदकर याच्याकडे जात असल्याचे एसीपी प्रकाश निलेवार यांनी न्यायालयात सांगितले.