Sun, Jul 21, 2019 06:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभय कुरुंदकर यांना सात दिवस पोलिस कोठडी(व्हिडिओ)

अभय कुरुंदकर यांना सात दिवस पोलिस कोठडी(व्हिडिओ)

Published On: Dec 08 2017 3:45PM | Last Updated: Dec 08 2017 4:29PM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी 
दीड वर्षापासून कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्‍विनी गोरे-बिद्रे यांच्या बेपत्ता प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांना पनवेल न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बिद्रे प्रकरणात यापूर्वी कुरुंदकर यांची तीन वेळा चौकशी झाली आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये बिद्रे यांच्या बेपत्ता झाल्याचा बातम्या प्रसारीत झाल्यानंतर मात्र, कुरुंदकर रजेवर गेले होते. मात्र, ठाण्यातच राहत होते. काल, सायंकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आज, त्यांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते. बिद्रे प्रकरणात संपूर्ण राज्यात चर्चेत आले असल्यामुळे पनवेल कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. 

कोल्हापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी राजू गोरे या गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी त्या निघाल्या मात्र, तेथे पोहोचल्याच नाहीत. त्यानंतर अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी नवी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. याच दरम्यान, अश्‍विनी आणि पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यात फोनवरून झालेली संभाषणाचे रेकॉर्डिंग अश्‍विनीचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले. त्यात कुरंदकर हे अश्‍विनीला व त्यांच्या कुटुंबाला गायब करण्याची धमकी देत असल्याचे पुरावे होते. त्यानंतर अश्‍विनीच्या कुटुंबीयांनी कुरुंदकर यांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अश्‍विनी बेपत्ता प्रकरणात कुरुंदकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने कुरुंदकर विरोधात कलंबोली पोलीस ठाण्यात भादवी 364, 506(2), 497, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही कुरुंदकर यांच्या विरोधात कुठलीही कारवाई न झाल्याने आणि अश्‍विनी हिचाही शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न न केल्याने अखेर ऑक्टोबर २०१६ कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.