Thu, Jun 20, 2019 00:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 40 पोलिस कर्मचार्‍यांना केवळ 15 निवासस्थाने

40 पोलिस कर्मचार्‍यांना केवळ 15 निवासस्थाने

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 12:56AMसोनपेठ : राधेश्याम वर्मा

शहरातील पोलिस निवास स्थानांची अत्यंत दुरवस्था झाली.यात केवळ 15 पोलिस   निवास करतात तर उर्वरित कर्मचारी भाडे तत्त्वावर खासगी निवासात वास्तव्य करत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे बी्रदवाक्य घेऊन रात्रंदिवस शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना निवासस्थाने कमी असल्याने पदरमोड करून आर्थिक भार सहन करत खासगी इमारतीत राहण्याची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली आहे.

सोनपेठ तालुक्याची निर्मिती होण्यापूर्वीपासून म्हणजेच  30 ते 40 वर्षांपूर्वी पोलिस निवास बांधली.या निवासस्थानात पाणी, स्वच्छता, इमारतीची दुरवस्था समस्या आहेत. येथील ठाण्यात 36 कर्मचारी व चार अधिकारी असे एकूण 40 कर्मचारी  आहेत. त्यांच्यावर तालुक्यातील 60, गंगाखेड तालुक्यातील 12 अशा 72 गावांची  जबाबदारी आहे. यांना राहण्यासाठी केवळ 15 निवासस्थाने असून त्यांचीही अत्यंत भयावह दुरवस्था झाली आहे. तर उर्वरीत कर्मचारी भाडे तत्त्वावर आपले वास्तव्य करत आहेत. या निवासस्थानाभोवती संरक्षक भिंत नसल्याने घाणीचे व डुकरांचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच निवासस्थानावर सिमेंटचे पत्रे असून त्याला छिद्र पडल्यामुळे ते पावसाळ्यात गळतात. तसेच त्याच्या खिडक्याही तुटलेल्या आहेत.जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र झटणार्‍या पोलिसांनाच त्यांच्या स्वतःच्या व कुटुंबाच्या संरक्षणासाठी सध्या मोठी कसरत करावी लागत आहे.सोनपेठ हे तालुक्याचे ठिकाण असून पोलिसांचे निवासस्थान मात्र कमकुवत आहे. यामुळे पोलिस कर्मचार्‍यांत असंतोष निर्माण होत असून याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.