Tue, May 21, 2019 18:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस खात्यात भरतीचे आमिष दाखवून गंडा

पोलीस खात्यात भरतीचे आमिष दाखवून गंडा

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:29AMडोंबिवली : वार्ताहर

पोलीस दलात नोकरी लावून देते, असे आमिष दाखवून जळगावच्या एका तरुणाला कल्याणच्या महिलेने तब्बल अडीच लाखांना गंडा घातल्याची घटना कल्याणात उघडकीस आली आहे. ही महिला स्वतः पोलीस असल्याची बतावणी करत होती. फसगत झालेल्या तरुणाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून कल्पना सपकाळे या महिलेचा शोध घेत आहेत.

जळगाव येथील यावल तालुक्यातील डोणगाव येथे राहणारा गजानन पाटील (25) हा तरुण पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगत होता. तो काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. याच दरम्यान त्याची ओळख कल्याण पश्चिमेकडील मंगेशी सिटी येथे राहणार्‍या कल्पनासोबत झाली होती. कल्पना ही देखील जळगावची असल्याने गजाननचा तिच्यावर विश्वास बसला. तिने गजाननला पोलीस दलात नोकरी लावून देते, असे आमिष दाखवून पैशांची मागणी केली. 

या आमिषाला बळी पडलेल्या गजाननने गेल्यावर्षी फेब्रुवारीत तिला अडीच लाख दिले. मात्र, नोकरीबाबत काहीच हालचाल दिसून येत नसल्याने त्याने याबबत महिलेला विचारले. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी कल्पनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने आरोपी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पण, अद्याप ही महिला हाती लागली नसून पोलीस तिचा शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकारी फौजदार भालेराव यांनी दिली.