Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक;मुंबईतील झाडावर विषप्रयोग

धक्कादायक;मुंबईतील झाडावर विषप्रयोग

Published On: Mar 12 2018 11:26AM | Last Updated: Mar 12 2018 11:45AMजोगेश्‍वरी : वार्ताहर

गोरेगाव आरे कॉलनीमध्ये आंब्याच्या झाडाच्या खोडावर विषप्रयोग करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर स्थानिकांनी आरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार आरे प्रशासनाने  शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. मुंबईतील एकमेव जंगल भाग असणार्‍या गोरेगाव आरे कॉलनी दुग्ध वसाहतीतील वृक्षांवर विषप्रयोग करून झाडे नष्ट करण्याचा प्रकार अनेकवेळा याआधी घडला  होता. युनिट क्र.31 येथील मोठ्या आंब्याच्या वृक्षाच्या खोडावर खोल छीद्र पाडून त्यात अ‍ॅसिडसारखा विषारी द्रव्य टाकण्यात आला आहे. यामुळे आंब्याचे झाड सुकत चालले असल्याची माहिती  स्थानिकांनी दिली. 

ही घटना समजल्यानंतर आरे पोलीस स्टेशन, आरे प्रशासन, दुग्धविकास आयुक्त यांना लेखी तक्रार करण्यात आल्याचे तक्रारदार नीलेश धुरी यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा  नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. येथील शासकीय पर्यवेक्षकीय निवासस्थान क्रमांक 2 च्या समोरील अंगणात जवळपास 35 ते 40 फुट उंचीचे आंब्याचे झाड आहे. त्याच्या खोडाला 15 ते 20 छिद्रे पाडण्यात  आली आहेत. त्यातून काळसर रंगाचा द्रव्य सध्या बाहेर येत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून सुरु असल्याचा आरोप होत आहे. झाडांच्या जिवांवर उठलेल्यांवर कारवाई  करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.  आरे कॉलनीत सर्वच ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड सुरु आहे. मेट्रो जवळील झाड जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. वृक्ष कापणे अवघड  झाल्यामुळे विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आरेतील वृक्षांवर सर्वांचाच डोळा आहे. -दयानंद स्टॅलिन, वनशक्ती संस्था

काही व्यावसायिकांसाठी याआधीही असे प्रकार करण्यात आले होते. जानेवारी महिन्यामध्येच युनिट क्रमांक 13 मधील पिंपळ, जांभळाच्या काही झाडांवर विषारी द्रव्याचा वापर करत त्यांना मारण्याचा  प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.