Thu, Apr 25, 2019 18:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिक, थर्माकोल प्लेट्स, ताट, वाट्यांच्या वापरावर लवकरच बंदी 

प्लास्टिक, थर्माकोल प्लेट्स, ताट, वाट्यांच्या वापरावर लवकरच बंदी 

Published On: Mar 06 2018 10:31AM | Last Updated: Mar 06 2018 10:31AMमुंबई : प्रतिनिधी

गुढीपाडव्यापासून प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी लागू करण्यावर राज्यात भर देण्यात येणार आहे. प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार करण्यात आलेल्या प्लेट्स, ताट, वाट्या यांसारख्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भात प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच तो राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची पर्यावरणमंत्री कदम यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रात रोज 1800 टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्याचा फार मोठा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यासाठी राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलपासून बनविलेल्या प्लेट्स,  ताट, वाट्या, ग्लास, चमचे, कप, प्लेक्स, बॅनर्स, तोरण अशा वस्तूंवर राज्यात बंदी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने, साठवणूक करणारे, वापर करणारे अशा सर्व घटकांवर कायदेशिररित्या कारवाई करण्यात येणार आहे.

यासंदर्भात करण्यात येणार्‍या नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी व दंडात्मक कारवाईची जबाबदारी पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलीस यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करणे व जनजागृतीसाठी बचतगट, सेवाभावी संस्था यांना जिल्हा नियोजन विकास निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा असेही या प्रारुप आराखड्यात नमूद केल्याची माहिती त्यांनी दिली. प्लास्टिकच्या रिसायकलिंगद्वारे ऑईल तयार करणे, चटया तयार करणे, गार्डनमधील प्लास्टिक बेंचेस, प्लास्टिक दोर्‍या कशा तयार करू शकतो याची माहिती पर्यावरणमंत्र्यांनी प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना बैठकीत दिली.