Sat, Jul 20, 2019 09:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांनो व्हा अलर्ट; प्लास्टिक पडेल महागात!

मुंबईकरांनो व्हा अलर्ट; प्लास्टिक पडेल महागात!

Published On: Jun 18 2018 4:42PM | Last Updated: Jun 18 2018 4:41PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

तुम्हीही प्लास्टिक वापरण्याचा हट्ट धरत असाल तर सावध व्हा. कारण प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने काढले आहे. प्लास्टिक पूर्णपणे हद्दपार व्हावे यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात येणार आहे.  प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ५ ते २५ हजार दंड आणि तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

राज्यभर प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. तरीही अनेकजण सर्रास प्लास्टिकचा वापर करताना दिसतात. अशाच मनमानी कारभार करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी २३ जून पासून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

प्लास्टिकला कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे व्यापारी आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अशातच सरकार पिशव्या, थर्माकॉल, स्ट्रॉ आणि प्लास्टिकचे चमचे या उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. 

प्लास्टिकला उपलब्ध असणाऱ्या इतर पर्यायांची माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून वरळी येथे २२ ते २४ जून पर्यंत एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री काजोल हजेरी लावून लोकांना प्लास्टिक न वापरण्याचे अवाहन करणार आहेत. 

या प्रदर्शनात कागदी पिशव्या, डिग्रेडेबल पिशव्यांची उत्पादने, बॉटल क्रशिंग आणि प्लास्टिकचा पूर्णवापर कसा करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळणारे किरण दिघावकर यांनी सांगितले. 

BMC जमा करणार प्लास्टिक 

ज्या लोकांकडे अद्याप प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्यांनी महानगरपालिकेने उभारलेल्या केंद्रांवर जमा करता  येतील. 

जास्त प्लास्टिक असेल तर महानगरपालिकेच्या 18000222357 या क्रमांकावर फोन करून ते घेऊन जाण्यास सांगू शकता. ज्या हौसिंग सोसायटींकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आहे ते या हेल्पलाईनची मदत घेवू शकतात. 

महानगरपालिकेने प्लास्टिक जमा केंद्र प्रत्येक वॉर्डमध्ये आणि मुख्य बाजारात उभारले आहेत. 

प्लास्टिक पडेल किती महागात (दंड)

प्लास्टिक बंदीच्या कारवाईसाठी २०० पोलिसांची टीम बनवण्यात आली आहे. 

प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांना पाच हजारपासून २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.

तसेच, तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

व्यापाऱ्यांमध्ये राग

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने सरकारच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. जर मोठ्या व्यापाऱ्यांना प्राथमिक पॅकींगसाठी प्लास्टिक वापराची परवानगी आहे तर छोट्या व्यापाऱ्यांना ही सूट का दिली जात नाही. यामुळे आमचा संपूर्ण व्यवसाय विस्कळीत झाला आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी सांगितले.