Thu, Jul 18, 2019 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीचे अधिकार महसूल, पोलिसांना

प्लास्टिकबंदीचे अधिकार महसूल, पोलिसांना

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 1:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीची अधिसूचना लागू झाली असून, प्लास्टिकबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यास 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच तीन महिने कारावास होईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी दिली.

मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कदम म्हणाले, राज्यात रोज 1800 टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत असतो. सध्या पिण्याच्या पाण्याच्या लहान बाटल्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, मोठ्या बाटल्यांवरील बंदीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. प्लास्टिक तसेच थर्माकोलचा साठा असलेल्या उद्योगांना त्यांच्याकडील साठा संपविण्यासाठी मुदत देण्यात येईल. या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार तलाठी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, वनअधिकारी व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणार्‍याला शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्लास्टिक उद्योगातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यात येईल. दुधाच्या पिशवीला 50 पैसे, तर पाण्याच्या बाटलीला एक रुपया अनामत रक्‍कम आकारली जाईल. मात्र, पिशवी तसेच बाटली परत केल्यानंतर रक्‍कम ग्राहकाला परत मिळेल. दूध किंवा पाण्याच्या बाटली दरात वाढ होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कापडी पिशवीसाठी बचत गटांना पाच कोटी

उद्योगांकडील साठा संपवण्यासाठी मुदत

प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून महिला बचत गटांनी कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू केली आहे. त्यांना पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. महिला बचतगटांच्या या कापडी पिशव्या लवकरच बाजारात येतील. कापडी पिशवीनिर्मिती योजनांसाठी राज्यातील पालकमंत्र्यांनीही बचतगटांना निधी द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे कदम म्हणाले.

 

Tags : mumbai, mumbai news, plastic ban, police and revenue department, Recovery rights,