Mon, May 20, 2019 22:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीवर एक ‘कदम’ मागे 

प्लास्टिकबंदीवर एक ‘कदम’ मागे 

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात सर्वत्र प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली असली तरी ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांना यातून वगळण्यात आले असतानाच आता किरकोळ दुकानदारांनाही पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्यास सशर्त मुभा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी केली.  

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. सरसकट प्लास्टिकबंदीमुळे किरकोळ विक्रेत्यांना येत असलेल्या अडचणींबाबत किरणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लास्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या पॅकेजिंगवरची बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

विशेष म्हणजे एका वृत्त वाहिनीवर झालेल्या चर्चेत कदम यांनी हा निर्णय झाल्याची माहिती दिली. किराणा दुकानदारांना दिलासा देणार्‍या या निर्णयाचा अध्यादेश गुरुवारीच निघणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिक बंदीच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त पर्यावरण मंत्र्यांनी फेटाळून लावले. हे मतभेद असल्याचे चित्र माध्यमांनीच रंगवले असून, त्यात काही तथ्य नाही.

प्लास्टिक बंदीच्या निर्णय प्रक्रियेत स्वत: मुख्यमंत्री सहभागी असल्याचे सांगत कदम म्हणाले, प्लास्टिक बंदीवर आतापर्यंत स्थापन झालेल्या दोन्ही समित्या मुख्यमंत्र्यांनीच तयार केल्या. बुधवारीसुद्धा आदित्य ठाकरे यांनी किराणा दुकानदारांचे गार्‍हाणे मांडण्यासाठी भेट घेतली तेव्हा त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी तीन तास चर्चा केली. त्यानंतर आम्ही तीन तास बसलो आणि किराणा दुकानातील मालासाठी प्लास्टिक वापरण्याची सशर्त मुभा देण्याचा फार मोठा निर्णय आम्ही घेतला.