Thu, Sep 20, 2018 13:00



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकार'

'बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकार'

Published On: May 22 2018 1:08PM | Last Updated: May 22 2018 1:08PM



मुंबई : प्रतिनिधी

महागाई कमी करण्याचे अश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर अवाजवी कर आकारणी करून जनतेची लूट करीत आहे. इंधनावरील हे अन्यायी कर आणि अधिभार तात्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकार असा टोला भाजप सरकारला लगावला आहे.

मोदी आणि फडणवीसांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन लोकांची मते घेतली व सत्ता मिळवली. पण सत्तेवर बसल्यावर इतर अश्वासनांप्रमाणेच महागाई कमी करण्याच्या आश्वासनाचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे. महागाई कमी करणे तर दूरच; उलटपक्षी इंधनावर अन्याय कर व अधिभार लादून सर्वासमान्यांची लूटमार करित आहे. सध्या देशपातळीवर महाराष्ट्र राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत आजचा पेट्रोलचा दर ८४.४० रूपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र व राज्य सरकारने मिळून टाकलेला कराचा प्रचंड बोझा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

पेट्रोलच्या किंमतीचा विचार केल्यास त्यातील ५० टक्क्यांहून अधिक रक्कम राज्य आणि केंद्र सरकारने लावलेल्या विविध करांमुळे द्यावी लागते. डिझेलबाबत हे प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील अन्यायी कर व अधिभार रद्द करून इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी केंद्र सरकारने जाणीवपूर्वक सुमारे तीन आठवडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थीर ठेवल्या. परंतु, निवडणूक संपताच दररोजच दरवाढ सुरू असून, यातून केंद्र सरकारची देशाची दिशाभूल व फसवणूक करण्याची मानसिकता अधोरेखीत होते, अशी टीका त्यांनी केली.