Tue, Jul 07, 2020 20:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका!

मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका!

Published On: May 21 2019 9:49AM | Last Updated: May 21 2019 9:49AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असुन  मुंबईत आज पेट्रोल ५ पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ७६.७८ रुपये मोजावे लागणार आहेत.  डिझेलच्या दरातही ९ पैशांची वाढ झाली आहे. 

तर पुण्यात पेट्रोल ७६.६६ रूपये प्रति लिटर आणि डिझेल ६८.१५ रूपये प्रति लिटर इतके झाले असून औरंगाबादमध्येही पेट्रोलचे दर ७७.८७ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७०.७६ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर ७१.१७ रूपये आणि डिझेलचे दर ६६.२० रूपये प्रति लिटर झाले आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रती बॅरलमागे ७० डॉलरहून अधिक आहे. गेल्या ऑगस्टमध्ये खनिज तेलाचा दर इतका असताना भारतात पेट्रोलचा दर ७८ रुपयांच्या, तर डिझेलचा दर ७०  रुपयांच्या आसपास होते. मात्र सध्याच्या घडीला भारतात पेट्रोल ७३, तर डिझेल ६७ रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाल्यानं आता लवकरच इंधन दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे.