होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्या मुंबईत खाण्या-पिण्याचे होणार वांदे

उद्या मुंबईत खाण्या-पिण्याचे होणार वांदे

Published On: Sep 09 2018 2:30AM | Last Updated: Sep 09 2018 2:19AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी विरोधकांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारतबंदमुळे मुंबईचे अर्थचक्र सहा तास बंद पडण्याची चिन्हे असून, आहार ही हॉटेल व्यावसायिकांची संघटनाही या बंदमध्ये उतरल्याने खाण्यापिण्याचेही हाल होऊ शकतात.  मुंबईतील 37 मोठ्या मार्केट्सनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. सोमवारी होणार्‍या या बंदमध्ये मुंबईतील जनतेनेही सहभागी व्हावे, आणि सरकारचा निषेध करावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. 

काँग्रेसच्या या भारतबंदला राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (शरद यादव), भाकप, माकप, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (कवाडे गट), राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आदींनी पाठिंबा दिला आहे. या पक्षांच्या संलग्न संघटनांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. याशिवाय मुंबईतील बँक संघटना, इन्शुरन्स संघटना आणि पेट्रोल पंप असोसिएशन तसेच आहार संघटना यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत देण्यात आली. 
सोमवारी मुंबईतील सर्व हॉटेल्सदेखील सहा तास बंद राहणार असून, बँक व्यवहारदेखील ठप्प होणार आहेत. मुंबईतील 37 मोठे मार्केट्सदेखील भारत बंदमध्ये सहभागी होत आहेत. 

केंद्र सरकारविरोधातील या बंद मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सर्व सरकारी-खाजगी व्यवस्थापनाचे कामकाज, रिक्षा, टॅक्सी आणि बसची वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे बंद केली जाणार असून रिक्षा, टॅक्सीचालकांच्या सर्व संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक म्हणाले की, पेट्रोलवर अबकारी कर 8 रुपये प्रति लिटर होता. आज तो 19 रुपयांवर गेला आहे. आज 22 राज्यांत भाजपचीच राज्य सरकारे आहेत. तेव्हा या सरकारांची इच्छाशक्‍ती असेल तर ते दर कपातीचा निर्णय घेऊ शकतात. भाजप सरकारला धक्‍का देण्याची ही सुवर्णसंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आहे. आर्थिक राजधानी बंद झाली तर देश बंद झाल्याचे चित्र त्यातून उभे राहील.