Tue, May 21, 2019 01:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोल्ट-फ्लिपर दाम्पत्य दुःख विसरले; इतर पेंग्विनमध्ये मिसळले

मोल्ट-फ्लिपर दाम्पत्य दुःख विसरले; इतर पेंग्विनमध्ये मिसळले

Published On: Aug 29 2018 8:35AM | Last Updated: Aug 29 2018 8:35AMमुंबई : प्रतिनिधी

भारतात प्रथमच स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या बेबी पेंग्विनचा गेल्या बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्याचे पालक मोल्ट व फ्लिपर अतिशय दु:खी झाले होते. दोन ते तीन दिवस ते अन्नही खात नव्हते. पण आता ते या दु:खातून काहीसे सावरले आहेत. सोमवारपासून ते इतर पेंग्विनमध्ये मिसळू लागल्याने राणीबाग प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

मोल्ट नराकडून फ्लिपर या मादीने 5 जुलै रोजी अंडे दिले होते. अंड्यातून 40 दिवसांनी पिल्लू जन्माला आले. भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतात पहिल्या बेबी पेंग्विनचा जन्म झाला. त्याचे पालक मोल्ट व फ्लिपर त्याची काळजीही घेत होते. मात्र गेल्या बुधवारी यकृत निकामी झाल्याने बेबी पेंग्विनचा मृत्यू झाला. बेबी पेंग्विच्या मृत्यूनंतर दु:खी मोल्ट व फ्लिपर दोन ते तीन दिवस काही अन्नही खात नव्हते. अन्न खात नसल्याने राणीबाग प्रशासनालाही या दोघांची काळजी वाटू लागली होती. शनिवारपासून दोघेही अन्न खाऊ लागल्याने प्रशासनाची काळजी काहीशी कमी झाली. मात्र हे दोघे इतर पेंग्विनमध्ये मिसळणार कधी असा प्रश्‍न प्रशासनाला सतावत होता. अखेर सोमवारपासून हे दोघे सर्व पेंग्विनमध्ये मिसळू लागले आहेत.

फ्लिपरने अंडे दिल्यापासून फ्लिपर व मोल्ट अंड्याची 40 दिवस काळजी घेत होते. तसेच जन्माला आलेल्या बेबी पेंग्विनची काळजीही घेत होते. त्यामुळे अंडे दिल्यापासूनचे 40 दिवस व बेबी पेंग्विन जन्माला आल्याचा एक आठवडा फक्त फ्लिपर व मोल्ट बेबी पेंग्विनमध्ये गुंतल्यामुळे अचानक बेबी पेंग्विनचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. आता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. - डॉ. संजय कुमार त्रिपाठी, संचालक, राणीबाग प्राणिसंग्रहालय