Sat, Jul 20, 2019 23:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जागतिक दर्जाच्या रेल्वे संग्रहालयाचा मार्ग मोकळा!

जागतिक दर्जाच्या रेल्वे संग्रहालयाचा मार्ग मोकळा!

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

विविध रेल्वे संघटनांच्या विरोधामुळे रेल्वे बोर्डाने एक पाऊल मागे घेतल्याने जागतिक दर्जाचे संग्रहालय बनवण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यानुसार सीएसएमटी इमारतीतील तळमजला आणि पहिला मजला वापरण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जागतिक दर्जाचे रेल्वे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या ड्रीम प्रकल्पापैकी एक असलेला हा प्रकल्प आहे. तो प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे लटकला होता. परंतु, आता तो लवकरच मार्गी लागेल. यासाठी दुसर्‍या मजल्यावरील कार्यालय जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकासह अन्य अधिकार्‍यांच्या हेरिटेज कार्यालयाचा मानही कायम राहील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

27 नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री मुंबई दौर्‍यावर होते. एल्फिन्स्टन येथील लष्करी पुलाच्या कामाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी स्थानकाला भेट दिली. सीएसएमटी येथील वस्तुसंग्रहालयाचीदेखील पाहणी गोयल यांनी केली. पाहणी करताना गोयल यांच्यासमवेत कलादिग्दर्शक नितीन देसाई, तर इनटॅकच्या उपाध्यक्षा (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज) तसनीम मेहता इ. उपस्थित होते. या वेळी रेल्वेमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीत जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्याबाबत सूचना केल्या होत्या. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यामुळे येथे जागतिक दर्जाचे रेल्वे वस्तुसंग्रहालय बनविण्याची सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.