Sun, Mar 24, 2019 23:28
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आसनगाव स्थानकात प्रवाशांचा रेलरोको

आसनगाव स्थानकात प्रवाशांचा रेलरोको

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आसनगाव : वार्ताहर 

सततच्या तांत्रिक बिघाडाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. त्यात भरीस भर म्हणजे लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेससाठी लोकल खोळंबून ठेवल्या जात असल्याने प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडत आहे. मंगळवारी सकाळी आसनगाव स्थानकातही याचाच प्रत्यय आला. सकाळी 8:30 ची आसनगाव-सीएसएमटी जलद लोकल राज्यराणी एक्स्प्रेससाठी खोळंबून ठेवल्याने संतप्त प्रवाशांनी रेलरोको केला. यावेळी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनीही उतरून लोकल प्रवाशांसोबत हुज्जत घातल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. 

मध्य रेल्वे मार्गावर लोकल वाहतुकीत लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसचा खोडा काही नवीन नाही. यामुळे प्रवासी आधीच संतप्त आहेत. दरम्यान, प्रवासी नेहमीप्रमाणे आसनगाव स्थानकातून सुटणार्‍या लोकलची वाट बघत होते. त्याचवेळी राज्यराणी एक्स्प्रेस शेजारील लूप लाईनवर घेण्यात आली. त्यामुळे लोकलला थांबवून ही एक्स्प्रेस आधी काढणार असल्याने लोकल प्रवाशांनी थेट ट्रॅकवर धाव घेतली. यावेळी पहिली लोकल मार्गस्थ करा, त्यानंतर एक्स्प्रेस काढा, अशी मागणी प्रवाशांनी स्टेशन प्रबंधकांकडे लावून धरली. याचवेळी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनीही ट्रॅकवर उतरून पहिली एक्स्प्रेस सोडण्याची मागणी केली. प्रवाशांचा हा तिढा सोडवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी व स्टेशन प्रबंधकांनी मध्यस्थी करत प्रथम लोकल व यानंतर राज्यराणी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून हा रेलरोको झालाच नसल्याचे सांगण्यात आले. तर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी संबंधित प्रवाशांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. रेलरोको झालाच नाही, तर रेल्वे पोलीस कोणावर गुन्हा दाखल करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.