Tue, Jul 23, 2019 02:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चोरांना प्रतिकार करताना चाकू भोसकल्‍याने एक ठार

चोरांना प्रतिकार करताना चाकू भोसकल्‍याने एक ठार

Published On: Dec 04 2017 6:11PM | Last Updated: Dec 04 2017 6:11PM

बुकमार्क करा

पनवेल  प्रतिनिधी

जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या 4 अनोळखी इसमापैकी एकाने त्याच्याकडील धारदार चाकूने चोरीस विरोध करणार्‍या एका इसमास भोसकून ठार मारल्याची घटना पनवेल तालुक्यातील न्यू कॉलनी रोहिंजण गाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. हे चौघेही चोर पसार झाले असून, तळोजा पोलीस पथक या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

विकासाच्या दिशेने झेपावणार्‍या पनवेलध्ये चोरी, घरफोडीचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील न्यू रोहिंजण गाव रुम नं.12, अमन मार्केटच्या गेटसमोर अब्दुल रजिक होसिलदार शेख (वय 26) व त्याचा भाऊ निजाम उर्फ अलीआझम होसिलदार शेख (35) यांच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 4 चोरटे चोरीच्या उद्देशाने घुसले.  हे दोघे त्यांच्या खोलीत झोपले असताना मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्या घराच्या खिडकीची ग्रील कोणीतरी अज्ञात इसम तोडत असल्याचा आवाज त्यांना झाल्याने ते दोघे झोपेतून जागे झाले व घराबाहेर येवून त्यांनी पाहिले. त्यावेळी 4 अनोळखी इसम जबरी चोरी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. त्या दोघांनीही प्रसंगाचे गांभीर्य पाहून त्या चोरट्यांचा प्रतिकार करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या चकमकीत त्यापैकी एकास निजाम उर्फ अलीआझम होसिलदार शेख याने पकडून ठेवले असता, त्या चार जणांपैकी एकाने त्याच्याकडील धारदार चाकूने निजामवर पाठीमागे  कंबरेच्या वरील बाजूस भोसकून वार केले. चाकूने वार केल्याने निजाम उर्फ अलीआझम होसिलदार शेख यांस गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या सर्व चकमकीत ते चौघेही चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, वपोनि. रवींद्र बुधवंत व त्यांचे पथक अधिक शोध घेत आहे.या घटनेमुळे रोहिंजण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलीस या चौघा गुन्हेगारांचा  युद्धपातळीवर शोध घेत आहे.