Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदीच PNB घोटाळ्याचा मास्टरमाईंड

नीरव मोदीच PNB घोटाळ्याचा मास्टरमाईंड

Published On: Feb 15 2018 2:27PM | Last Updated: Feb 15 2018 2:51PMमुंबई : प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11 हजार 300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसूली संचनालयाने मनी लाँन्ड्रीग अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुंबईसह देशभरातील मालमत्तावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी हे परदेशात पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : भारताबाहेर पळालेले नीरव मोदी आहेत तरी  कोण? 

हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी साथीदार आणि पंजाब नॅशनल बँकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत 280 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार बँकेकडून अगोदरच देण्यात आली आहे. त्याच्या तापसात घोटाळ्याची व्याप्ती 11 हजार 300 कोटी असल्याचे उघड झाले. नीरव मोदी यांची आई, पत्नी आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती मिळते. शिवाय पीएनबीने या आरोपींविरोधात सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितल्याचे समजते.

वाचा : PNB म्हणजे नवा #Modiscam?; काँग्रेसचे टीकास्त्र

पंजाब नॅशनल बँकेच्या काही खातेदारांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे आतापर्यंतच्या तापसात उघड झाले आहे. तसेच इतर बॅंकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आला होता. नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप यात ठेवण्यात आला आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचे दाखवून सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची (मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचे पत्र) मागणी बँकेकडे केली गेली. अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर हे पत्र काढण्याची मागणी करून याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचे सामान मागवण्यात आले. 

वाचा : नीरव मोदीला प्रियांकाची नोटीस

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली.  त्यानंतर सुमारे 280 कोटी रुपयांचे सामान आणण्यात आले. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितले. यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे लेटर दाखवले आणि पेमेंटची मागणी केली. त्यावर जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरा, असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेत एक रुपयाही तारण न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावले होते.

नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचे उघड झाले आहे. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती मिळते. त्यामुळे मोदी यांच्यासह बँकेतील अधिकारीही तपास यंत्राणांच्या रडारवर आहेत.