Sun, May 26, 2019 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आई वडिलांना एवढच कळालं की मुलगा साहेब झाला

आई वडिलांना एवढच कळालं की मुलगा साहेब झाला

Published On: Jun 01 2018 8:15PM | Last Updated: Jun 01 2018 8:15PMजव्हार : तुळशीराम चौधरी

पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने याने एमपीएससी परीक्षेत यश मिळविले. खडकीपाड्यात रस्त्याची सोय नसून, एसटी बसही जात नाही. या पाड्यात जाण्यासाठी ओहळातून कच्ची पायवाट आहे. आदिवासी पाड्यात राहून शेती करणारे कल्पेशचे आई-वडील निरक्षर असून, डोंगर उतारावर त्‍यांना दीड एकर शेती आहे. अशा परिस्थितीतून शिक्षणाच्या  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कल्पेश चंदर जाधवने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेत यश संपादन  केले आहे. इतकेच नाही, तर यंदा राज्यसेवा परिक्षेत कल्पेश जाधव हा उत्तीर्ण उमेदवारांमधील तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला आहे. आता तो राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजू होणार आहे. त्याच्या या यशामुळे आई वडिलांना तर आनंद झालाच आहे. मात्र, गाववाल्यांना देखील मोठा आंनद झाला आहे. 

जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवची घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. कल्पेशचे शिक्षण खडकीपाडा येथे इयत्ता ४ थी पर्यंतचे शिक्षण जि.प. शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण कावळे आदिवासी आश्रम शाळेत असून, १२ वीपर्यंतचे शिक्षण बोर्डीच्या कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून घेतले. पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कल्याण येथील आदिवासी वसतिगृहात राहून बिर्ला महाविद्यालयातून गणित विषय घेवून पदवी घेतली आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण असताना एमपीएससी स्पर्धा परीक्षांची काश धरली आणि त्यांने कोणत्याही शिकवणीशिवाय केवळ युटय़ूबवरचे व्हिडिओ पाहून पूर्व परीक्षेची तयारी केली. 

कल्पेशच्या आई वडिलांच्या म्हण्यानुसार, कल्पेश घरी यायचा त्‍यावेळी म्हणायचा मी जेव्हा साहेब होईन तेव्हाच बूट घालेन. घरच्या गरिबीमुळे कल्पेशला कोणतेही क्लास लावणे किंवा कोणाचे मार्गदर्शन घेणे त्याला शक्य झाले नाही. मात्र, कल्पेश नेहमी म्हणायचा की आई मी साहेबच होणार, हे आमच्या मुलाने करून दाखविले, तो साहेब झाला असं आम्हला मोठ्या मुलांने दुस-यांकडे फोन लावून कळविले. कल्पेश जाधवच्या यशामुळे आता तो राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु होणार असल्याचे त्यांनी पुढारी ऑलाईनशी बोलतांना सांगितले. आता प्रशासकीय सेवा करताना उत्तम काम करण्याला प्राधान्य देणार आहे,’ अशी भावना कल्पेशने व्यक्त केली.

आम्ही अडाणी आम्हला काय माहिती तो काय झाला. परंतु तो साहेब झाला? हे समजले. एमपीएससी म्हणजे काय हे आई-वडिलांना माहीतच नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सकाळी सांगितल्यावरही त्यांना काही कळले नाही. अखेर सोप्या शब्दांत त्यांना ‘मी साहेब झालो’ एवढेच सांगितल्यावर ते आनंदित झाले. त्यानंतर ते मजुरीच्या कामाला निघूनही गेले, असे कल्पेशने सांगितले. तेव्हा ते गावभर सांगत होते की, आमचा मुलगा साहेब झाला. 

स्वाभिमान शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षण संघटनेकडून कल्पेश जाधवच्या आई वडिलांचे श्रीफळ व पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. गावात व्यवस्थित कुठलीही शिक्षण सुविधा नसतानाही कल्पेशने राज्यसेवा परीक्षेत मिळविलेले यश हे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याचा आणि त्यांच्या अडाणी अशिक्षित कुटुंबाचा आम्ही शिक्षक स्वाभिमान शिक्षक संघटनेतर्फे आभिनंदन करतो. स्वाभिमान शिक्षक संघटनेच्या अध्यक्षेच्या म्हन्यानुसार हा आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहे. त्यामुळे आम्हलाही त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. असे स्वाभिमान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र साहरे, श्याम भोये यांनी सांगितले.