होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपशी युती नाहीच : उद्धव

भाजपशी युती नाहीच : उद्धव

Published On: May 31 2018 4:59PM | Last Updated: May 31 2018 5:59PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना आणि भाजपामधील राजकीय वैर पुन्हा एकदा उफाळुन आले आहे. आता भाजपशी युती नाहीच, असे ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मतांच्या आकडेवारीचा घोळ घालणार्‍या निवडणुक आयोगावरही निशाणा साधला.

शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही सरकारमधुन बाहेर पडणार का, असा प्रसारमाध्यमांनी प्रश्‍न केला असता आजचा दिवस लोकशाही वाचवण्याचा आहे. सत्तेतुन बाहेर पडण्याबाबत आज काहीही बोलणार नाही, असे उद्धव म्हणाले.

पालघरमध्ये भाजपने साम-दाम-दंड-भेद वापरुन विजय मिळवला आहे. हा पराभव मी मानत नाही. शिवसेनेने पहिल्यांदाच पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवली. वनगा कुंटुंबाला न्याय देण्यासाठी शिवसैनिक ताकदीने लढले. गेल्या निवडणुकीत भाजपचा 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला होता. मात्र यावेळी 8 लाखांपैकी 6 लाख मतदारांनी भाजपला नाकारले आहे. यावरुन भाजपची लोकप्रियता घसरल्याचे सिध्द झाले आहे.

केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर हे सरकार पुढील पंचवीस वर्षे सत्तेत राहील, असे आपल्याला वाटले होते. पण गेल्या चार वर्षातील कारभारावरुन या सरकारबद्दल आपला भ्रमनिराश झाला आहे. आतापर्यंतच्या झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. 

 ईव्हीएमचा घोळ लवकरात लवकर मिटवावा, अन्यथा सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक न लढवण्याबाबत विचार केला पाहीजे. निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असून क्रिकेटप्रमाणे आता निवडणुकांसाठीही परदेशातून थर्ड अम्पायर मागवायला हवेत. 

उत्तर प्रदेशातील कैराना पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही उत्तरमप्रदेशमधील जनतेने भाजपाला नाकारत योगी आदित्यनाथ यांना झटका दिला आहे. 

- उद्धव ठाकरे, सेना पक्षप्रमुख